मुंबई : सहा जागांसाठी होणाºया राज्यसभा निवडणुकीत भाजपाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांना ऐनवेळी सातवा उमेदवार म्हणून रिंगणात उतरविल्याने निवडणूक चुरशीची होणार अशी चर्चा रंगली असली तरी, रहाटकर माघार घेणार असल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.भाजपातर्फे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आधीच अर्ज भरला आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि केरळचे माजी भाजपा प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आदींच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. त्याचवेळी भाजपाने विजया रहाटकर यांचाही अर्ज भरल्याने राजकीय कुजबुज सुरू झाली.रहाटकर यांना भाजपाने नेमके कशासाठी उभे केले? काँग्रेसचे उमेदवार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांची वाट रोखली जाणार का, असे तर्कवितर्क सुरू झाले. शिवसेनेची अतिरिक्त मते, अपक्ष आमदार आणि लहान पक्षांच्या आमदारांची मते घेऊन भाजपा रहाटकरांना जिंकविण्यासाठी प्रयत्न करेल, असे गणितदेखील मांडले गेले.तथापि, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, रहाटकर माघार घेतील. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने विरोधकांवर दबाव म्हणूनदेखील रहाटकर यांचा अर्ज भरला गेला असण्याची शक्यता आहे. विधानसभा सदस्यांमधून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या या जागांसाठी मतदान हे खुले असते. गुप्त मतदान असले तर घोडेबाजाराला वाव असतो. खुल्या मतदानामुळे मतांची उघड फोडाफोडी भाजपा करणार नाही आणि निवडणुकीत घोडेबाजार केल्याचा आरोप स्वत:वर लादून घेणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे रहाटकर या अर्ज मागे घेतील.>रहाटकरांचा अर्ज कशासाठी?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी भाजपाच्या विधिमंडळ कार्यालयात आले आणि विजया रहाटकर यांचाही अर्ज आपल्याला भरायचा आहे, असे त्यांनी सांगितले. त्याआधीच रहाटकर यांना निरोप देण्यात आला होता. व्ही. मुरलीधरन हे केरळमधून अर्ज भरण्यासाठी आलेले होते. अर्जासोबत जोडायची आवश्यक कागदपत्रे त्यांनी आणली होती पण काही जोडपत्रे यावयाची होती. ती शेवटच्या क्षणापर्यंत आली. उद्या एखादे कागदपत्र राहून गेले म्हणून त्यांचा अर्ज रद्द झाला तर पर्यायी व्यवस्था म्हणून रहाटकर यांचा अर्ज भरण्यात आल्याचे भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. उद्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून १५ मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येईल.>केतकरांचा अर्ज दाखलच्काँग्रेसतर्फे ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनीही सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी महाराष्ट्राचे पक्षप्रभारी मोहन प्रकाश, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शेकापचे आ. गणपतराव देशमुख, समाजवादी पक्षाचे नेते आ. अबू आसिम आझमी, प्रा. जोगेंद्र कवाडे आदी नेते उपस्थित होते.राष्टÑवादी काँग्रेसने वंदना चव्हाण आणि शिवसेनेने अनिल देसाई यांनापुन्हा संधी दिली असून या दोघांनी यापूर्वीच आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
भाजपाच्या रहाटकर माघार घेणार, बिनविरोध निवड अटळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 5:45 AM