पणजी : आम्ही संघ सोडलेला नसून, आपत्काल स्थितीमुळे सामाजिक कार्याच्या आड येणारी यंत्रणा झुगारली आहे. मातृभाषेचा घात करणाऱ्या भाजपा सरकारला निवडणुकीत धडा शिकवूनच मूळ संघात परत जाणार, असे गोवा प्रदेश संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी स्पष्ट केले. कुजिरा-बांबोळी येथे रविवारी पार पडलेल्या प्रदेश संघाच्या पहिल्याच मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी सुमारे दोन हजारांवर कार्यकर्ते उपस्थित होते. वेलिंगकर म्हणाले, ‘संघाचे काम स्वयंसेवक स्वयंप्रेरणेने करतात. त्यामुळे संघात जुना संघ आणि नवीन संघ असे काहीच नाही. विशिष्ट स्थितीत काही निर्णय घ्यावे लागतात आणि तेच नेमके स्वयंसेवकांनी केलेले आहे. शिक्षणाचे माध्यम हे मातृभाषेतून असावे, हे तत्त्व संघाच्या धोरणाला अनुसरून आहे आणि त्याच धोरणाचे अनुकरण स्वयंसेवक करीत आहेत. त्यासाठी संघातील प्रचलित यंत्रणा जर अडसर ठरत असतील, तर काही काळासाठी ही यंत्रणा झुगारूनही स्वयंसेवक काम करतात. त्यासाठी सशर्त पाठिंबा हे कोकण प्रांताचे धोरण हास्यास्पद आहे. मातृभाषा रक्षणासाठी सशर्त पाठिंबा नव्हे, तर बिनशर्त व सक्रिय पाठिंबा द्यावा लागतो. आंदोलनाच्या अनुषंगाने संघाची कॉँग्रेस सरकारच्या वेळी एक भूमिका आणि भाजपा सरकारच्या वेळी दुसरी भूमिका असूच शकत नाही. संघ हा सामाजिक संवेदनांपासून वेगळा नाही. मातृभाषेचा घात करणाऱ्या भाजपाचा पाडाव करण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन वेलिंगकर यांनी केले.’ (प्रतिनिधी)नाना बेहरेंची मुलगीही मेळाव्यातकोकण प्रांताने गोवा विभागाचे संघचालक म्हणून नियुक्त केलेले नाना बेहरे यांची मुलगी व जावई या दोघांनीही कुजिरा येथील प्रदेश संघ मेळाव्यात सहभाग घेतला होता. वेलिंगकर यांना भेटून त्यांनी नमस्कारही केला. भाषा मंचच्या आंदोलनास संघाचा पाठिंबा असल्याचे बेहरे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर म्हटले होते. शिवसेनेचा वेलिंगकरांना पाठिंबा!शिवसेनेने माध्यमप्रश्नी वेलिंगकर यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. राजकीय दबावाखालीच वेलिंगकर यांना गोवा संघचालकपदावरून काढून टाकल्याचा आरोप सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. गोव्यासाठी शिवसेनेची राज्य कार्यकारिणी राऊत यांनी जाहीर केली असून, आगामी विधानसभा निवडणुकीत जे २० मतदारसंघ सेना लढविणार आहे, त्या मतदारसंघांची नावेही येत्या आठ दिवसांत घोषित केली जातील, असे स्पष्ट केले. राऊत यांनी उपराज्यप्रमुखपदी अक्षय उर्फ पांडुरंग शिरोडकर, राजेश गावकर व बाबुराव नाईक या तिघांची नियुक्ती केली आहे.
भाजपाला धडा शिकवूनच मूळ संघात परतणार
By admin | Published: September 12, 2016 4:21 AM