मुंबई – विधानसभा अध्यक्षांवर आम्ही दबाव आणत नाही तर सर्वोच्च न्यायालयाचा दबाव आहे. विधानसभा अध्यक्षांनी घटनेनुसार शपथ घेतली. त्याआधी वकील म्हणून सनद घेतलीय. त्यांच्या कारकिर्दीत गेल्या १ वर्षापासून घटनेचा, कायद्याचा महाराष्ट्रात खून होताना दिसतोय. त्यावर विधानसभा अध्यक्षांना काय वाटत नसेल तर विधिमंडळाच्या इतिहासात काळ्याकुट्ट पानावर त्यांचे नाव लिहिले जाईल. जनतेच्या न्यायालयात याबद्दल रोष आहे. त्याची किंमत सगळ्यांना मोजावी लागेल असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शिंदे गटावर निशाणा साधला.
खासदार संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यांवर राजीनामा दिला, भाजपाकडे नितीमत्ता आणि नैतिकता थोडीही शिल्लक असेल तर ते या १६ आमदारांच्या अपात्रेवर निर्णय घेतील. आपलीच लोकं सोडून जातायेत हे उद्धव ठाकरेंना कळाले तेव्हा त्यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी का जाऊ, विधानसभेत आटापिटा का करू याला नैतिकता म्हणतात. ती उद्धव ठाकरेंकडे होती. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांना ज्या गोष्टीत कल्याण वाटते. त्यांचे २०२४ च्या निवडणुकीत अकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच भाजपाच्या नेतृत्वात सध्याचे एनडीए ही नौटंकी आहे. इंडिया आघाडीची स्थापना झाली, पाटणा, बंगळुरूत बैठक झाली तोपर्यंत त्यांना एनडीएची आठवण झाली नव्हती. मग त्यांनी इकडून तिकडून लोकं गोळा करून दिल्लीत एनडीए म्हणून बैठक घेतली. शिवसेना-अकाली दल नसेल तर एनडीएची ताकद शून्य आहे. आम्हीच नाही, बाकी लोकं येतात आणि जातात, एनडीए अस्तित्वात नाही. एनडीएत आज जे चित्र दिसतेय ते राहतेय की नाही ही शंका आहे. इतकेच नाही तर २०२४ पूर्वी भाजपा पक्षही फुटलेला असेल असा दावा खासदार संजय राऊतांनी केला.
दरम्यान, सनातन धर्माला कुणी मुळासकट उखडून टाकू शकत नाही. सनातन धर्म या देशात आणि जगात कायम राहील. AIDMK हेदेखील सनातन धर्माविरोधात होते. आम्ही सर्व मजबुतीने सनातन धर्मासाठी काम करू, मोदींना चिंता करण्याचे कारण नाही. भाजपाने सनातन धर्माच्या संरक्षणाचा ठेका घेतला नाही. इथं शिवसेना बसलीय, आम्ही काम करू, धर्माच्या रक्षणासाठी आम्हाला कुणी अडवू शकत नाही. हा निवडणुकीचा मुद्दा नाही. सनातन धर्माची तुम्हाला अचानक चिंता लागली आहे. २०२४ साठी भाजपा आणि मोदींकडे काही मुद्दा नाही. महागाई, बेरोजगारी, चीन घुसखोरी हे मुद्दे आहेत. राष्ट्रीय सुरक्षा, कॅनडा हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. परंतु सनातन धर्माचा मुद्दा उचलला जातोय. प्रत्येकाला आपापल्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे असंही मत संजय राऊतांनी सडेतोड मांडले.