लातूर: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा राज्यातील 48 पैकी 40 जागा जिंकू शकेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. युतीच्या संभ्रमात राहू नका, तुम्ही तयारीला लागा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिल्या. लातूरमध्ये भाजपाच्या बूथ विजय अभियानाला सुरुवात झाली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वबळाचे संकेत दिले. या कार्यक्रमाला भाजपा अध्यक्ष अमित शहादेखील उपस्थित आहेत. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवण्यासाठी 2 कोटी मतांची आवश्यकता आहे, असं गणित यावेळी मुख्यमंत्र्यांनी मांडलं. 'आपल्याला विजयासाठी दोन कोटी मतांची गरज आहे. राज्यातील सरकारच्या लाभार्थ्यांची संख्या दोन कोटींपेक्षा अधिक आहे. त्यामुळे ४० जागा जिंकण्याच्या तयारीला लागा. भाजपाचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे कार्यकर्ता आहे. संघटना हीच ताकद आहे. युती होईल की नाही, हे अध्यक्ष ठरवतील. २०१४ साली ‘अबकी बार-मोदी सरकार’ हा नारा होता. आता ‘फिर एकबार - मोदी सरकार’ हा नारा आहे. येणारा विजय मोठा असेल. स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा. एकहाती सत्ता मिळवायची असेल तर दोन कोटी मते लागतील. त्यापेक्षा अधिक लोकांपर्यंत आपण योजना पोहोचवल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी प्रत्येक घरांपर्यंत गॅस पोहोचवला. ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली,' अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं.
मित्रपक्षांच्या जागा लढवून भाजपा लोकसभेच्या 48 पैकी 40 जागा जिंकेल- मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2019 6:28 PM