Sanjay Raut Aditya Thackeray Ayodhya Visit: शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे १५ जूनला अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी आज शिवसेना खासदार संजय राऊत हे लखनौमध्ये दाखल झाले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची सविस्तर माहिती दिली. त्याच वेळी, भाजपाच्या राज्यसभा विजयाबाबत वक्तव्य केले. भाजपाने महाराष्ट्रातील राज्यसभेची एक जागा जिंकली म्हणजे पाकव्याप्त काश्मीर भारताने पुन्हा मिळवलं असं नाही, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
"विधानपरिषद निवडणुका लक्षात घेता आमदारांना अयोध्येत न येता मुंबईत, महाराष्ट्रात थांबायला सांगितले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी काही गणिते चुकली हे मान्य करायला हवे. पण भाजपाने राज्यसभेची एक जागा जिंकली म्हणजे चीनने भारताची बळकावलेली भूमी परत मिळाली असं होत नाही किंवा पाकव्याप्त काश्मीर परत भारतात आला असं होत नाही. निवडणुकांमध्ये असे निकाल लागत असतात", अशा खोचक शब्दांत त्यांनी भाजपाला सुनावले.
अपक्ष आमदारांची राऊत, शिवसेनेवर नाराजी?
"किरीट सोमय्या ज्या प्रकारचे आरोप माझ्यावर लावत आहेत, त्याचा माझ्याशी काहीच संबंध नाही. मी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप ते करत असतील तरी मी सांगतो की मी निवडणुकांबद्दल संबंधित बोललेलो नाही. आम्ही भ्रष्ट पद्धतीने मतदान घेतलं असतं, तर संजय पवार जिंकले असते. मी सर्व अपक्षांशी चर्चा केली आहे. शरद पवारांशीही चर्चा केली आहे. आमदार देवेंद्र भुयार यांच्याशी माझी चर्चा झाली. ते प्रामाणिकपणे बोलत होते असं मला वाटलं", असे स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिले.
आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत...
आदित्य ठाकरे १५ जूनला अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांचे इथे दिवसभर विविध कार्यक्रम आहेत. त्या दिवशी ते महाआरतीसाठी मंदिरात असणार आहेत. त्यादिवशीची महाआरती काहीशी वेगळ्या पद्धतीची असेल. त्या सर्व गोष्टींच्या तयारीसाठीच आम्ही इथे आलो आहोत. आमचे नाशिक आणि ठाण्यातील शिवसैनिक या आधीच अयोध्येत दाखल झाले होते. आताही हजारो शिवसैनिक अयोध्येत आले आहेत, अशी माहिती राऊतांनी दिली.