ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. २९ - लातूर महानगर पालिका प्रभाग क्रमांक २ (अ) आणि लातूर पंचायत समिती गातेगाव गणासाठी रविवारी पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारी सकाळी जाहीर झाला असून, मनपात काँग्रसेचे रमेशसिंह बिसेन ७३६ मतांनी विजयी झाले आहेत. तर पंचायत समिती गातेगाव गणात भाजपाचे ज्ञानेश्वर जुगल १४० मतांनी विजयी झाले आहेत.मनपाच्या प्रभाग क्रमांक २ (अ) चे माजी महापौर अख्तर शेख यांचे जात प्रमाणपत्र विभागीय जात पडताळणी समितीने रद्द केले होते. त्यामुळे या रिक्त जागेवर रविवारी पोटनिवडणूक झाली. सोमवारी सकाळी १० वाजता मनपाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मतमोजणी झाली. यावेळी काँग्रेसचे रमेशसिंह बिसेन यांना सर्वाधिक २ हजार १०३ मते मिळाली. भाजपाचे हमीद बागवान यांना १ हजार ३६७ मते मिळाली. राष्ट्रवादीचे अन्वर कुरेशी यांना २१० तर महाराष्ट्र विकास आघाडीचे अॅड़ गोपाळ बुरबुरे यांच्या पारड्यात २२८ मते पडली. अपक्ष उमेदवार शिरिष देवकत्ते यांना केवळ १६ मते पडली असून, ३३ नकारार्थी मतदान झाले आहे. तथापि, काँग्रसेचे रमेशसिंह बिसेन ७३६ मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी घोषित केले.लातूर पंचायत समिती गातेगाव गणाचे सदस्य बाळासाहेब कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. या निवडणुकीत एकूण पाच उमेदवार रिंगणात होते. त्यात भारतीय जनता पार्टीचे ज्ञानेश्वर संभाजी जुगल यांनी सर्वाधिक २ हजार ९३४ मते घेतली आहेत. ते १४० मतांच्या फरकाने विजयी झाले असून, काँग्रेसच्या उमदेवार सुनिता बाळासाहेब कदम यांना २ हजार ७९४ मते मिळाली आहेत. शिवसेनेचे महादेव सुरेश काळे यांना २६६, राष्ट्रवादीचे विशाल विजयकुमार वाघमोडे यांना १७१ मते मिळाली आहेत. या निवडणुकीतही ५१ मतदारांनी नकारार्थी मतदान हक्क बजावला आहे.