मुंबई, दि. 23 - मुंबई, दि. 23 - मीरा-भाईंदर महापालिकेची निवडणूक भाजपाने मनी आणि मुनीच्या बळावर जिंकली असा आरोप शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी बुधवारी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मीरा-भाईंदरमध्ये भाजपाला मतदान करण्याचे आवाहन करणा-या जैन मुनी नयपद्मसागरजी महाराज यांची तुलना शिवसेनेने थेट झाकीर नाईकशी केली. नयपद्मसागरजी महाराज यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
1992 साली मुंबईत दंगल झाली तेव्हा हिंदू म्हणून शिवसेनेने जैन समाजाचे रक्षण केले होते असे संजय राऊत म्हणाले. जैन समाजाला आमच्यापासून तोडण्याचा प्रयत्न सुरु आहे पण त्यांनी लक्षात ठेवावे त्यांची टक्कर शिवसेनेशी आहे. जातीय आधारावर मत मागितली जात आहेत त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचा काय आहे ते समजवावे लागेल असे संजय राऊत म्हणाले. आज अनेक जैन मुलींना लव्ह-जिहादमध्ये फसवलं जात असून, शिवसेना त्यांना वाचवेल असे राऊत म्हणाले.
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत शिवसेनेने आठ जैन उमेदवार उभे केले होते. त्यातला एक उमेदवार विजयी ठरला. अन्य सात जण दुस-या स्थानावर राहिले. मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेला अन्य भाषिकांनीही मतदान केले असा दावा संजय राऊत यांनी केला. दोन दिवसांपूर्वी निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतरच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपाने निवडणूक जिंकण्यासाठी जैन मुनींचा आधार घेतला असा आरोप केला होता. सरनाईक यांच्या ओवळा-माजीपाडा विधानसभा मतदारसंघाचा काही भाग मीरा-भाईंदरमध्ये येतो.
मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात हिंदी भाषिक, गुजराती, जैन मतदारांची संख्या जास्त आहे. त्यातुलनेत मराठी मतदार कमी आहेत. त्यामुळे शिवसेनेला अपेक्षित यश मिळवता आले नाही अशी सारवासारव शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. मराठी मतदारांचे प्राबल्य असलेल्या भागामध्ये आम्ही सर्व जागा जिंकल्या असा दावा त्यांनी केला. भाजपाची राजकीय ताकत कमी पडल्याने त्यांनी जैन धर्मगुरुंचा आधार घेतला असा आरोप त्यांनी केला. प्रचार संपल्यानंतर भाजपाने जैन धर्मगुरुंना प्रचारात उतरवल आणि त्यांचा संदेश जैन-गुजराथी समाजापर्यंत पोहोचवला असे सरनाईक म्हणाले.