...तर भाजपाने संविधान बदलले असते, पण धोका अजूनही कायम, काँग्रेसचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 06:14 PM2024-08-23T18:14:50+5:302024-08-23T18:15:08+5:30
Congress News: लोकसभा निवडणुकीत देशाच्या जनतेने लोकशाही व राज्यघटना वाचवली. ४०० जागांचे बहुमत मिळाले असते तर भाजपाने संविधान बदलले असते परंतु संविधानावरील धोका अजून टळलेला नाही, असे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे.
नाशिक - भारतीय जनता पक्ष व आरएसएस देशाला तोडू पहात आहेत पण राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा व भारत जोडो न्याय यात्रा काढून देशाला जोडण्याचे काम केले आहे. भाजपा आजही धर्म व जातीच्या आधारावर देश तोडण्याचे काम करत आहे. लोकसभा निवडणुकीत देशाच्या जनतेने लोकशाही व राज्यघटना वाचवली. ४०० जागांचे बहुमत मिळाले असते तर भाजपाने संविधान बदलले असते परंतु संविधानावरील धोका अजून टळलेला नाही, असे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीची उत्तर महाराष्ट्रातील तयारीची आढावा बैठक व पदाधिकारी मेळावा नाशिक येथे संपन्न झाला. या मेळाव्याला प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आदी उपस्थित होते.
यावेळी प्रभारी रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. महिला,शाळकरी मुलींवरील अत्याचार रोखण्यात महायुती सरकार अपयशी ठरले आहे. बदलापुरची घटना अत्यंत गंभीर असून पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यासही विलंब लावला. महायुती सरकारच्या विरोधात जनतेत प्रचंड रोष आहे. बदलापूरच्या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सरकार विरोधात आवाज उठवावा, असे आवाहन प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले आहे.
यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले की, लोकसभेत काँग्रेस इंडिया आघाडी सक्षम विरोधी पक्ष असल्याने आता भाजपाला मनमानी करता येत नाही. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकासह चार विधेयके मोदी सरकारला मागे घ्यावी लागली, ही विरोधी पक्षाची ताकद आहे. आता विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्ताबदल केला पाहिजे. महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत ११ व्या क्रमांकावर आहे, गुजरात, तेलंगणा राज्य महाराष्ट्राच्या पुढे गेले आहेत. नाशिकमधून महाविकास आघाडीच्या १५ च्या १५ जागी विजय मिळवा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार आणा, राज्याचे गतवैभव परत आणू असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.