मुंबई:म्हाडाच्या परीक्षेचा (MHADA Exam) पेपर फुटल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी पसरली. हजारो विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. परीक्षा रद्द केल्याच्या निर्णयावर भाजपकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. यातच भाजप महाराष्ट्र युवा मोर्चानेही या प्रकरणी निषेध व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच जितेंद्र आव्हाडांनीशरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे वाटोळे करणारी भेट दिली, अशी बोचरी टीकाही यावेळी करण्यात आली.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे वाटोळे करणारी भेट दिली आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राख रांगोळी करण्याची एकही संधी राज्यातील हे करंटे सरकार सोडताना दिसत नाही. हे सरकार उत्कृष्ट कामगिरी करत असेल, तर फक्त खंडणी आणि दलाली वसुलीमध्ये. बाकी विद्यार्थ्यांच्या सर्वच प्रश्नात अपयशी ठरलेले हे सरकार आहे. म्हाडाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री रात्री दोन वाजता केवळ एका व्हिडिओ बाईटच्या माध्यमातून देतात हे मोठे दुर्दैव आहे. आरोग्य सेवक भरती परीक्षेतही चार वेळा असे प्रकार झाले. आता म्हाडाच्या परीक्षामध्ये सुद्धा तोच प्रकार झाला, अशी टीका भाजप महाराष्ट्र युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केली.
राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
हे सरकार जनसामान्यांचे नाही, तर दलालांचे सरकार आहे. या गोष्टीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेले आहे. या सर्व परीक्षा एमपीएससी आयोगाच्या माध्यमातून घ्या, अशी मागणी विद्यार्थ्यांची असताना खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून स्वतःचे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी सरकार हे रॅकेट चालवत असल्याचे दिसते, असा हल्लाबोल करत या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णयाचा निषेध करत असून, राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा विक्रांत पाटील यांनी यावेळी दिला.
दरम्यान, परीक्षा जाहीर करायच्या आणि नंतर त्या पेपरफुटीच्या नावाखाली रद्द करायच्या. अशा प्रकारचा काळा कारभार सातत्याने सुरू आहे. एक परीक्षा यांना धड घेता येत नाही. मागे आरोग्य विभागाच्या परीक्षाही रद्द झाल्या. पेपर फुटला आणि त्याचा तार मंत्रालयापर्यंत गेलेली आहे. त्यामुळे या परीक्षांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. या सगळ्या कारभारामुळे राज्यातील तरुणांची प्रचंड ओढाताण सुरू आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणी कडक कारवाई केली पाहिजे. यामध्ये कोण दोषी आहे? कुणावर तरी दोषारोप झाला पाहिजे. मात्र कुणावरही दोषारोप होत नाही. मंत्री नामानिराळे, मुख्यमंत्री नामानिराळे. हे चालणार नाही. याबाबत फार मोठा रोष आहे. यावर कडक कारवाई व्हावी. आमची तर मागणी आहे या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.