ठाणे - कोरोना निर्बंध शिथिल केले जात असताना, दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासासाठी परवानगी देण्याच्या मागणीसाठी ठाणे शहर भाजपाच्या वतीने निर्बंध झुगारत व उद्धव ठाकरे सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत रेल्वेमधून प्रवास करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठ्या संख्येने कार्यरत पोलिसांनी भाजपा कार्यकर्त्यांना रोखले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आक्रमक आंदोलनात अनेक पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मुंबई व ठाण्यात निर्बंध कमी झाले, तरी लोकलमध्ये सामान्य प्रवाशांवरील बंदी कायम आहे. ठाणे शहरातून मुंबईत ये-जा करण्यासाठी किमान चार तासांचा अवधी लागतो. जिल्ह्यातील बदलापूर-कसारा, तर वसई-विरार येथून मुंबईत ये-जा करणाऱ्या प्रवाशांचेही हाल होत आहेत. सर्वच चाकरमान्यांना वर्क फ्रॉम होम शक्य नाही. त्यामुळे अनेकांना नोकरीच्या ठिकाणी जावेच लागते. त्यामुळे बहुसंख्य प्रवाशांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मात्र, या हालांची महाविकास आघाडी सरकारकडून दखल घेतली जात नाही. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भाजपाकडून मुंबई-ठाण्यात आंदोलने करण्यात आली. त्यानुसार ठाणे रेल्वे स्थानकात झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व आमदार निरंजन डावखरे व आमदार संजय केळकर यांनी केले. या आंदोलनात महापालिकेतील भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे, प्रदेश सचिव संदिप लेले, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, सुनेश जोशी, महिला आघाडीच्या अध्यक्षा मृणाल पेंडसे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना रेल्वे प्रवासाला परवानगी द्यायलाच हवी. मात्र, या न्याय्य मागणीकडे महाविकास आघाडी सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. लाखो प्रवाशांना केवळ राज्य सरकारमुळे दररोज आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागत आहे, अशी टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली. दररोज रस्त्याने प्रवासामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. लोकल प्रवासाला परवानगी मिळेपर्यंत भाजपाकडून आंदोलन केले जाईल, असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला.
सोशल मिडियातून प्रवाशांचा पाठिंबाभाजपाच्या आंदोलनातून लाखो सामान्य प्रवाशांची व्यथा उघड झाली. त्याला सोशल मिडियावरही प्रतिसाद मिळाला. भाजपाच्या आंदोलनाला प्रवाशी संघटनांबरोबरच लाखो प्रवाशांनी पाठिंबा दिला. तसेच लोकल प्रवासाला परवानगी देण्याची पुन्हा मागणी केली.`एवढा पोलिस बंदोबस्त लेडिज बारच्या ठिकाणी अपेक्षित' भाजपाकडून शांततामय पद्धतीने आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, भाजपाच्या कार्यकर्त्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने मोठ्या संख्येने पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. भाजपाचे आंदोलन होऊच नये. त्याचबरोबर कार्यकर्त्यांना रेल्वे प्रवासापासून रोखण्यासाठी पोलिस धडपडत होते. मुंबई-ठाण्यातील सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवरील शांततामय आंदोलने चिरडण्याच्या या वृत्तीचा आमदार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी निषेध केला. तसेच एवढा पोलिस बंदोबस्त लेडिज बारच्या ठिकाणी ठेवण्याची अपेक्षा होती, असा टोलाही आमदार डावखरे यांनी लगावला.