पाण्यासाठी भाजपचे आंदोलन म्हणजे 'मगरीचे अश्रू' : अनिल पटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 12:56 PM2020-01-28T12:56:30+5:302020-01-28T12:56:42+5:30
जलसंधारण मंत्री सुद्धा मराठवाड्यातील होते. असे असताना सुद्धा भाजपला मराठवाड्यातील पाणी प्रश्न सोडवता आला नाही.
औरंगाबाद : पंकजा मुंडे आणि भाजपच्या नेत्यांचे मराठवाड्याच्या सिंचन प्रश्नावर उपोषण म्हणजे 'मगरीचे अश्रू' असून सत्ता गेल्यावर त्यांना मराठवाड्याची आठवण आली असल्याची टीका माजी मंत्री आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल पटेल यांनी केली आहे. औरंगाबादमध्ये सुरु असलेल्या CAA विरोधातील उपोषणास्थळी भेट दिली असताना ते बोलत होते.
गेल्यावेळी राज्यात भाजपची सत्ता होती. एवढचं नाही तर पाणीपुरवठा मंत्री सुद्धा भाजपचाचं होता. त्याचप्रमाणे जलसंधारण मंत्री सुद्धा मराठवाड्यातील होते. असे असताना सुद्धा भाजपला मराठवाड्यातील पाणी प्रश्न सोडवता आला नाही. मात्र आता त्याच भाजपची नेतेमंडळी उपोषणाला बसत आहेत. त्यामुळे भाजपचे हे उपोषण म्हणजे 'मगरीचे अश्रू' असल्याचे पटेल म्हणाले.
राज्यभरात CAA ला विरोध करण्यासाठी सर्वच धर्मातील लोकं एकत्र येऊन आंदोलन, उपोषण करत आहे. त्यामुळे लोकांचे या सर्व गोष्टींवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपचे नेते असे काही उपोषण करत आहे. पाच वर्षे सत्ता असताना सुद्धा पाणी प्रश्नावर काहीच केलं नाही. मात्र आता सत्ता जाताच यांना मराठवाड्यातील पाणी प्रश्न आठवत असल्याचा टोला सुद्धा त्यांनी यावेळी भाजपला लगावला.