मुंबई - लातूर जिल्ह्यातील आघाडीची स्थिती काहीशी मजबूत दिसत आहे. माजीमुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे दोन मुलं यावेळी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून अभिनेता रितेश देशमुख दोघांच्या प्रचारासाठी लातुरात तळ ठोकून आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात तरी प्रचारामध्ये काँग्रेस पुढे दिसत आहे. त्यातच धीरज देशमुख यांना लातूर ग्रामीण मतदारसंघातून ऐनवेळी भाजपकडून मिळालेला बाय आणि शिवसेनेकडून देण्यात आलेल्या पार्सल उमेदवारामुळे निवडणूक काही प्रमाणात सुकर झाल्याची चर्चा मतदार संघात आहे.
लातूर जिल्हा एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला. परंतु, विलासराव देशमुख यांच्या पश्चात लातूर काँग्रेसला काही प्रमाणात उतरती कळा लागली. लोकसभेपाठोपाठ काही विधानसभा मतदार संघ, महानगर पालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत, पंचायत समितीत भाजपने काँग्रेसला सलग धक्के दिले. मात्र अमित देशमुख यांनी आपला मतदारसंघ सुरक्षीत ठेवला.
आता लातूर शहरमधून अमित आणि ग्रामीणमधून धीरज देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वास्तविक पाहता, रेणापूर मतदारसंघ म्हणजेच आताचा लातूर ग्रामीण. याच मतदार संघातून गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात भाजपच जाळ विनलं होतं. त्यामुळे भाजपसाठी येथे आधीच पायाभरणी झाली होती. त्यानुसार रमेश कराड यांनी तयारी देखील सुरू केली होती. मात्र भाजपकडे हा मतदारसंघ जाणार नाही, यासाठी वरच्या पातळीवर सुत्रे फिरल्याची चर्चा आहे. त्यामुळे या मतदार संघातून धीरज यांना अप्रत्यक्षरित्या भाजपकडून बाय मिळाला का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
दुसरीकडे मतदारसंघातील पंचायत समितीत देखील प्रतिनिधीत्व नसलेल्या शिवसेनेला हा मतदारसंघ देण्यात आला. शिवसेनेने देखील मतदार संघातील ताकतीनुसार मुंबईत वास्तव्य असलेल्या सचिन देशमुख यांना उमेदवारी देऊन धीरज देशमुख यांना मोडके तोडके आव्हान देण्याचा प्रयत्न केला. एकूणच या सर्व घडामोडीमुळे धीरज यांना भाजपचा बाय तर शिवसेनेचा ऐनवेळी आलेला हाय, अशी ही लढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.