मुंबई - राज्यसभेच्या २७ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत मित्रपक्षांच्या मदतीने सर्व सहा जागा लढविण्याचा भाजप विचार करत आहे. गेल्या वेळच्या राज्यसभा निवडणुकीप्रमाणे यावेळीदेखील धक्कातंत्राचा अवलंब करण्याची रणनीती आखली जात असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. मात्र, याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठींशी चर्चा करूनच होईल.
सध्याच्या संख्याबळानुसार, भाजपला तीन, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक अशा पाच जागा महायुतीला, तर एक जागा महाविकास आघाडीला मिळू शकते. मविआला दुसरी जागा निवडून आणण्यासाठी १५ मतांची गरज असेल, तर भाजपला तिसरी जागा जिंकण्यासाठी शिंदे गटाची मदत लागेल. स्वतःची चौथी आणि महायुतीची सहावी जागा जिंकण्यासाठी भाजपला मेहनत करावी लागेल. मविआत फूट पाडून काही मते वळविल्यास ते भाजपचे फार मोठे धक्कातंत्र असेल.
जिंकण्याची खात्री असेल तर....सर्व सहा जागा आम्ही लढवल्या आणि त्यातली एक हरली तर त्यातून सत्तापक्ष पराभूत झाल्याचा संदेश जाईल. त्यामुळेच सहाही जागा निश्चितपणे आपण जिंकू याची खात्री झाली, तरच सहावा उमेदवार दिला जाईल. याबाबतचा निर्णय लवकरच होईल, भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.