भाजपा ‘बेल आणि जेल’वाल्यांचा पक्ष -मल्लिकार्जुन खर्गे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 06:38 AM2018-07-10T06:38:01+5:302018-07-10T06:38:21+5:30
भारतीय जनता पार्टी म्हणजे गुन्हेगारांचा पक्ष बनला आहे. गेल्या वर्षभरात सर्व प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात प्रचंड वाढ झाली आहे.
मुंबई : भारतीय जनता पार्टी म्हणजे गुन्हेगारांचा पक्ष बनला आहे. गेल्या वर्षभरात सर्व प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात प्रचंड वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसला ‘बेल’गाडी म्हणाले होते, पण भाजपा तर ‘बेल’वरच्या आणि ‘जेल’मधल्या लोकांचा पक्ष बनला आहे, अशी टीका करीत, काँग्रेस सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी भाजपावर निशाणा साधला. एरवी भाषणबाजी करणारे मोदी दलित आणि मुस्लीम अत्याचारांच्या वाढत्या घटनांवर मात्र चकार शब्दही काढत नसल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.
महाराष्ट्राच्या प्रभारीपदी नियुक्ती झाल्यानंतर खर्गे प्रथमच दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आज दुसºया दिवशी खर्गे यांनी षण्मुखानंद सभागृहात मुंबई काँग्रेसच्या मेळाव्याला संबोधित केले. भाजपा सरकारच्या काळात दलित आणि अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ झाली आहे. भाजपाशी संबंधित लोकच या गुन्ह्यांमध्ये पुढे आहेत. मात्र, सतत भाषण करणारे मोदी याबाबत चकार शब्द काढत नाहीत. मोदी फक्त स्वत:बद्दलच बोलत असतात. आता देशाला त्यांचे भाषण नको, राशन हवे असल्याचे खर्गे म्हणाले. नरेंद्र मोदी काँग्रेसला ‘बेल’गाडी बोलले, परंतु भाजपाचे काही लोक ‘बेल’वर आहेत, तर काही लोक जेलमध्ये आहेत, तर काही लोक बँकांतील पैसा घेऊन पळून गेले आहेत. ललित मोदी, नीरव मोदी देशाबाहेर पळून गेले आहेत. आता मोदीला सरकारला सत्तेतून बाहेर पाठवायची वेळ आली असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसला सत्तेवर आणण्यासाठी अंतर्गत मतभेद संपविण्याचे आवाहन करून खर्गे म्हणाले की, सर्व कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. छोटे-मोठे मतभेद विसरून कामाला लागा. आपल्याला स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी, स्वत:च्या संरक्षणासाठी, लोकशाही वाचविण्यासाठी आणि संविधान वाचविण्यासाठी काँग्रेसला विजयी करावे लागेल. त्यासाठी त्याग करायची तयारी पक्षातील नेत्यांनी ठेवायला हवी. काँग्रेस घराघरांत पोहोचविणे, ही काळाची गरज आहे. म्हणूनच ‘काँग्रेस आपल्या दारी’ ही मोहीम सुरू केली आहे.
या वेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम, माणिकराव ठाकरे, प्रदेश सहप्रभारी संपत कुमार, सोनल पटेल आणि आशिष दुआ यांच्यासह काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते, आजीमाजी खासदार व आमदार उपस्थित होते.
भाजपाने त्यागाच्या गप्पा मारू नयेत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नव्हता. भाजपाचे लोक स्वातंत्र्यासाठी कधीच तुरुंगात गेले नाहीत, याउलट काँग्रेसचे हजारो लोक स्वातंत्र्यासाठी तुरुंगात गेले. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनीही देशासाठी बलिदान दिले. संघ आणि भाजपामधील कोणीही असा त्याग केला नाही, पण आता हिच मंडळी देशाला त्याग शिकवायला निघाली आहेत, असा टोलाही खर्गे यांनी लगावला.
निवडणुकांच्या
तोंडावर हमीभाव
भाजपाला सरकार चालविता येत नाही. दोन वर्षांत एकट्या महाराष्ट्रात १६ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या. आता निवडणुका नऊ महिन्यांवर आल्यामुळेच शेतकरी हमीभाव जाहीर केला. गेल्या चार वर्षांत हा निर्णय का घेतला नाही, असा सवालही त्यांनी या वेळी केला.