मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेनेतील राजकारण दिवसागणिक चांगलेच तापत आहे. त्यात आता राज्य सरकारच्या द्विवर्षपूर्तीचे औचित्य साधत आपल्या उल्लेखनीय कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यासाठी भाजपातर्फे नवनव्या पर्यायांचा विचार केला जात आहे. येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने ‘बेस्ट’ला टार्गेट करत ‘आता बदल दिसतोय, महाराष्ट्र घडतोय’ या जाहिरातींचा ओघ सुरू केला आहे.महापालिका निवडणुकांसाठी सेना-भाजपाने वेळ आल्यास स्वबळावर लढण्याची तयारी दर्शविली आहे. त्याचीच तयारी म्हणून भाजपाने आता स्वतंत्रपणे जोरदार जाहिरातबाजीला सुरुवात केली आहे. त्यासाठी राज्य सरकारने ‘बेस्ट’ बसेस आणि बसमधील टीव्ही, वर्तमानपत्रे, भित्तीपत्रे, होर्डिंग्स आणि बॅनर्स यांद्वारे जाहिरात करण्यास सुरुवात केली आहे.या जाहिरातींमध्ये ‘जलयुक्त शिवार’, ‘शेतकऱ्यांसाठी योजना’, ‘मुंबईतील मेट्रो प्रकल्प’, ‘रेल्वे प्रकल्पांतील राज्य सरकारचा वाटा’ अशा विविध योजनांच्या जाहिरातींद्वारे मतदारांना भुरळ घालण्यात येत आहे. दरदिवशी साधारणत: २८ ते ३० लाख प्रवासी बेस्टने प्रवास करतात. त्यामुळे जास्तीतजास्त प्रवाशांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘बेस्ट’ला टार्गेट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)>जाहिरातींचे हक्क खासगी कंपनीलाबेस्ट प्रशासनाने जाहिरातींचे कंत्राट खासगी कंपनीला दिले आहे. त्यामुळे जाहिरातींचे हक्क त्या कंपनीकडून हाताळले जातात. त्यांच्याकडून सर्व गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, जीपीएस यंत्रणा लावणे आदी गोष्टी करून घेतल्या जातात. या कंपन्यांना मिळणाऱ्या महसुलातून ठरावीक वाटा बेस्टला मिळतो. तसेच, जाहिरातींच्या वेळेतील दोन टक्के वेळ राखीव ठेवण्यात येतो. या वेळेत दाखविल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्ये तंबाखूजन्य पदार्थ आणि दारूच्या जाहिराती न दाखविणे कंत्राटदारावर बंधनकारक आहे. - डॉ. जगदीश पाटील, महाव्यवस्थापक, बेस्ट
भाजपाचे ‘बेस्ट’ टार्गेट
By admin | Published: November 02, 2016 2:10 AM