जळगाव: राज्यातील सत्तास्थापनेवरून शिवसेना-भाजपतील मतभेद प्रचंड विकोपाला गेल्याने 30 वर्षाची युती तोडून शिवसेनेने भिन्न विचारसारणीचे पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविकाआघाडीचे सरकार स्थापन केले.
भाजपा आणि शिवसेनेची युती तुटली असली तरीदेखील अनेक महानगरपालिमधील महापौर निवडणुकीच्यावेळी शिवसेनेने भाजपासोबत घरोबा केल्याचे दिसून आले. त्यातच जळगाव महानगरपालिकेच्या महापौर निवडीत देखील शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे भाजपाचा महापौरांची बिनविरोध निवड झाली.
भाजपच्या धोरणानुसार सव्वा वर्षाचा कार्यकाळ सीमा भोळे यांचा पूर्ण झाल्यामुळे त्यांनी महापौर पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून महापौर पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. भाजपाकडून भारती सोनवणे यांना महापौरपदाची उमेदवारी देण्यात आली होती. भारती सोनवणे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेने देखील भाजपाला समर्थन दिल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
दरम्यान, त्यांना सर्वपक्षीय पाठींबा मिळाला आणि त्यातच त्यांच्याविरूध्द अर्ज नसल्यामुळे सोमवारी पिठासीन अधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषित केली. याप्रसंगी भाजपचे सर्वपदाधिकारी उपस्थित होते. तर महापौरपदी निवड झाल्याबद्दल भारती सोनवणे यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. त्याचबरोबर मनपाच्या इमारती बाहेर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. दरम्यान, महानगरपालिकेच्या त्या १५ महापौर म्हणून निवड झाली आहे.