या महिन्यात होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या समिकरणांनुसार राज्यसभेच्या एकूण ६ जागांपैकी ३ जागा भाजपाला मिळण्याची शक्यता आहे. मात्र देशातील इतर राज्यांमधील राज्यसभा उमेदवारांची नावं भाजपाकडून जाहीर करण्यात आली असली तरी महाराष्ट्रातील उमेदवारांची नावं मात्र जाहीर झालेली नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपाच्या उमेदवारांबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपाकडून मेधा कुलकर्णी आणि विश्वास पाठक यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
भाजपाच्या आघाडीच्या महिला नेत्यांपैकी एक असलेल्या मेधा कुलकर्णी यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कोथरूडमधून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. तर २०१९ मध्ये भाजपाने त्यांना उमेदवारी नाकारून कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर मेधा कुलकर्णी नाराज होत्या. दरम्यान, आता होऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तसेच मेधा कुलकर्णी यांच्यासोबत विश्वास पाठक यांचंही नाव राज्यसभा उमेदवारीसाठी चर्चेत आहे. तर नुकतेच भाजपामध्ये आलेल्या अशोक चव्हाण यांनाही राज्यसभेची उमेदवारी मिळू शकते. मात्र भाजपाच्या संभाव्य उमेदवारांबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
दरम्यान, या निवडणुकीत भाजपा चौथा उमेदवार देण्याची शक्यता आहे. काल रात्री राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा केली. या बैठकीमध्ये महायुतीकड़ून या निवडणुकीत सहावा उमेदवार देण्याबाबत चर्चा झाल्याचेही वृत्त आहे. राज्यातील सध्याच्या समिकरणांनुसार राज्यसभेच्या सहा जागांपैकी ५ जागा महायुती जिंकू शकते. तर एक जागा काँग्रेसला मिळू शकते.