ऑनलाइन लोकमत बुलडाणा, दि. 2 - नोटबंदीचे ५० दिवस झाल्यानंतरही सरकार जनतेसाठी काही खास करू शकली नाही. या नोटबंदीमुळे सर्वसमान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. नोटबंदी म्हणजे भाजपाचा मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी करून नोटबंदीच्या निषेधार्थ जिल्ह्यात ६ व ८ जानेवारी रोजी मोर्चा व घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती दिली.स्थानिक काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात २ जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राहूल बोंद्रे, आमदार हर्षवर्धन सपकाळ, विजय खडसे, जि.प.अध्यक्षा अलका खंडारे, जयश्री शेळकेख बलदेवराव चोपडे, अंजली टापरे, मिनल आंबेकर, महेंद्र बोर्डे, मुख्त्यारसिंग राजपूत, अॅड.सुनिल देशमुख आदी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मोर्चाबाबत प्राथमिक माहिती देताना मोघे म्हणाले की, सरकारच्या नोटबंदीच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेससमितीतर्फे तालुकास्तरावरील प्रभारींची निवड करण्यात आली आहे. सदर प्रभारींच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरावर मोर्चा आंदोलन करण्यात येणार आहे. सदर आंदोलन दोन गटात करण्यात येणार असून प्रथम तालुकास्तरावर ६ जानेवारी रोजी तर दुसऱ्यांदा ८ जानेवारी रोजी राष्ट्रीयकृत बँक शाखेसमोर करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नोटबंदीमुळे बँकेत पैसेनसल्यामुळे अनेकांना खाली हात परत जावे लागले. याचा निषेधार्थ बँकेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. मोदी ऐतिहासिक कलाकारशिवाजीराव मोघे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर आरोप करीत पंतप्रधान मोदी ऐतिहासिक कलाकार आहेत. ते ज्या प्रकारे सर्वसामान्य नागरिकांना संमोहित करतात, नागरिक त्यांच्या इशाऱ्यावर चालतात. यावरून ते ऐतिहासीक कलाकार असल्याचे समोर आले आहे. नोटबंदीच्या माध्यमातून करोडो रूपये बदलण्यात आले आहेत, हे आता समोर येत आहे. मात्र मागिल ५० दिवसात सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे जनतेने या त्रासाचा निषेधार्थ आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
नोटाबंदी भाजपाचा सर्वात मोठा भ्रष्टाचार - शिवाजीराव मोघे
By admin | Published: January 02, 2017 8:23 PM