भाजपाची काळी जादू चालणार नाही, मविआ सरकार ५ वर्ष चालणार; काँग्रेसचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 04:16 PM2022-03-29T16:16:32+5:302022-03-29T16:17:10+5:30
राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर सत्तेत आलेले आहे असं नाना पटोलेंनी सांगितले.
भंडारा - भाजपाने सत्तेसाठी पहाटेचा प्रयोग केला परंतु तो फसल्यामुळे वैफल्यग्रस्त भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडी सरकारविरोधात सातत्याने कटकारस्थाने करत आहे. सत्ता गेल्यामुळे भाजपची तडफड होत असून महाविकास आघाडी सरकारवर भाजपची काळी नजर आहे. परंतु भाजपची ही काळी जादू काही चालणार नाही आणि मविआ सरकार पूर्ण ५ वर्ष चालणार असा विश्वास महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी व्यक्त केला आहे.
भंडारा येथे कार्यक्रमावेळी प्रसार माध्यमांशी नाना पटोलेंनी संवाद साधला. ते म्हणाले की, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर सत्तेत आलेले आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे राज्य सरकारपुढे अनेक समस्यांचा डोंगर उभा होता आता परिस्थिती पूर्वपदावर येत असून यापुढे किमान समान कार्यक्रम राबविला जाईल असं त्यांनी सांगितले.
तसेच सरकारमधील तीनही पक्ष बरोबरचे भागिदार आहेत आणि त्याचा विरोधकांना त्रास होत आहे. मविआ सरकार अस्थिर व्हावे यासाठी विरोधकांकडून जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत. भारतीय जनता पक्षाने केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करुन, राजभवनच्या मदतीने सरकार पाडण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी त्यात त्यांना यश येणार नाही. सत्ता नसल्याने भाजपाचा जीव कासावीस झाला आहे परंतु महाविकास आघाडीचे सरकार भक्कम असून ५ वर्षांचा कार्यकाळ हे सरकार पूर्ण करेल असा टोला प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लगावला आहे.
काँग्रेस बाप आहे, बापच राहणार
राष्ट्रवादी नवरा आहे, शिवसेना बायको आहे आणि काँग्रेस वऱ्हाडीच्या भूमिकेत आहे, अशी प्रतिक्रिया नुकतीच भाजपा खासदार सुजय विखे यांनी केली होती. यावर नाना पटोले यांनी काँग्रेस बाप आहे, बापच राहणार असा प्रतिटोला सुजय विखे पाटील यांना लगावला होता. सुजय विखे नवखे आहेत. त्यांना फार महत्त्व देण्याची गरज नाही असंही नाना पटोलेंनी म्हटलं होतं.