फलटण (जि. सातारा) : ‘महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठी व सत्तेच्या स्वार्थापोटी भाजपने युती तोडण्याचे पाप केले आहे. असल्या मतलबी व जनतेला लुबाडणाऱ्या प्रवृत्तींना विधानसभा निवडणुकीद्वारे ठेचून काढीत भगवा फडकवा,’ असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ‘लोकसभा निवडणुकीत मोदी लाट, मोदी लाट म्हणणाऱ्यांना साताऱ्यात का लाट दिसली नाही?,’ असा खोचक सवालही यावेळी त्यांनी भाजपला केला. फलटण-कोरेगाव राखीव विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार डॉ. नंदकुमार तासगावकर यांच्या प्रचारार्थ येथील घडसोली मैदानासमोर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख दिवाकर रावते, डॉ. नंदकुमार तासगावकर, माण-खटावमधील शिवसेनेचे उमेदवार रणजितसिंह देशमुख, वाईचे उमेदवार डी. एम. बावळेकर, कोरेगावचे हणमंतराव चवरे, बारामतीचे राजेंद्र काळे, शिवसेना जिल्हाप्रमुख नंदकुमार घाडगे उपस्थित होते.‘यापूर्वी आपण युतीमध्ये होतो. आता एकटे आहोत. मात्र, निष्ठावंत शिवसैनिकांच्या जोरावर सर्वांना भारी आहोत, याचा विसर कोणी पडू देऊ नये. भाजपने सत्तेसाठी शिवसेनेचा वापर करून घेतला. त्यांच्या सत्ता स्थापण्यात आमचा सिंहाचा वाटा आहे. आता शिवसेनेला संपवायला संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ महाराष्ट्रात प्रचाराच्या निमित्ताने आदळणार आहे. याप्रसंगी शिवसैनिकांनी आपली ताकद निवडणुकीद्वारे दाखवून द्यावी,’ असेही ठाकरे यांनी सांगितले. ‘आजपर्यंत दादा-बाबांच्या टोळीने जनतेला लुबाडले. पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साखरसम्राट आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना संपविण्याचे काम केले आहे. त्यांना काँग्रेसवाल्यांनी साथ देत जनतेला पाण्यापासून व विकासापासून वंचित ठेवण्याचे पाप केले आहे. आमचे सरकार १९९५ साली सत्तेत असताना आम्ही झोनबंदी उठविली. आता सत्तेत आल्यावर दोन कारखान्यांमधील अंतर उठविण्याबरोबरच रंगराजन समितीच्या शिफारशीही राबविणार आहोत,’ असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा भाजपचा डाव
By admin | Published: October 02, 2014 10:59 PM