मुंबई : जनतेने तीन पक्षांना बहुमत दिले असून बहुमताच्या आधारे हे सरकार काम करतेय मात्र कधी याला तुरुंगात टाकतो तर कधी त्याला तुरुंगात टाकू अशा धमक्या द्यायच्या आणि आता त्यातून काही होत नाही म्हटल्यावर विधानसभेत गुंडगिरी, धमक्या व मारामारी करण्याचे काम भाजप करतेय हे लोकशाहीला घातक असून ही गुंडगिरी खपवून घेणार नाही असा स्पष्ट इशारा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.आज विधानसभेत भाजपकडून गुंडगिरी करण्यात आली. यावर बोलताना नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी घटना कधी घडली नाही. आणि विशेष म्हणजे या गोष्टी घडत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याचे नेतृत्व करत होते ही दुर्दैवी बाब आहे असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला.विधानसभेत ओबीसींच्या आरक्षणाबाबत केंद्राकडून इम्पिरियल डाटा मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. त्या प्रस्तावावर विरोधी पक्षाने हरकत उपस्थित केली. त्यामुळे पीठासीन अधिकार्यांनी बोलण्याची संधी दिली. त्यानंतर ओबीसी नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुद्देसूद घटनाक्रमाची माहिती दिली. त्यावेळी पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांनी प्रस्ताव मतास टाकल्यानंतर त्यांचा माईक उचलला, असे ते म्हणाले.
भाजपवाल्यांना आता गुंडगिरी करून विधानसभेचे कामकाज थांबवायचे असेल तर ते आघाडी सरकार कधीही खपवून घेणार नाही. अध्यक्षांच्या चेंबरमध्ये अध्यक्ष आणि पीठासीन अधिकारी भास्कर जाधव उपस्थित होते. त्यांच्याजवळ जाऊन भाजपच्या आमदारांनी शिवीगाळ केली. - नवाब मलिक, अल्पसंख्याक मंत्री