मुंबई - डोक्यात सतत राजकारण असल्याने सुप्रियाताईंना काळ वेळेचे भान राहत नाही. "जुमला "शब्द मोठ्याने म्हणायचा आणि पिताश्री मंत्री असलेल्या काँग्रेस सरकारची गरीबांची, महिलांची पिळवणूक करणारी कृत्ये नजरेआड करायची अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटद्वारे सुप्रिया सुळेंच्या टीकेला उत्तर दिले. बावनकुळेंनी म्हटलं की, अहो, सुप्रियाताई कशाला सिलिंडरचे दर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कमी केल्याच्या बोंबा मारता? तुमचे राजकीय शिक्षक तुम्हाला सोयीचे शिकवतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी डोळ्यासमोर निवडणुका ठेवत नाहीत. तो धंदा तुम्हाला पोटापाण्याला लावणाऱ्या मनमोहन सिंग नेतृत्वातील यूपीए सरकारचा होता असं त्यांनी सांगितले.
तसेच मोदी सरकारचे धोरण मातृवंदन आहे. तुम्हाला आठवत नाही म्हणून सांगतो, गेल्यावर्षीच्या रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मोदींनी एक अभूतपूर्व निर्णय घेतला. भारतातील ७५ लाख महिलांना मोफत गॅस सिलिंडर दिले होते. इतकेच नाही, तर सर्वसामान्य गॅस ग्राहकांच्या सिलेंडरवर २०० रुपयांची कपात केली होती आणि उज्ज्वला गॅस योजनेतील (PMUY) माता भगिनींना सिलेंडरवर ४०० रुपयांची सवलत दिली होती. आठवा जरा असा टोला बावनकुळेंनी सुप्रिया सुळेंना लगावला.
दरम्यान, आज जागतिक महिला दिन आहे. हा मंगलयोग साधून नारीशक्तीला वंदन करण्यासाठी मोदींनी आज १०० रुपयांची कपात केली आहे. अर्थात, तुम्हाला हाही दिवस राजकीय वाटतो म्हणा आणि हो सुप्रिया ताई, एक रिपोर्ट जरूर वाचा. जेव्हा तुमच्या सरकारचे पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली यांनी कोणत्या निवडणुकीच्या तोंडावर " नऊवरून १२सिलिंडर वाढवले होते..' जरूर वाचा, म्हणजे काँग्रेसी "जुमला "कळेल. तर असो, ज्यांच्या शेतीच्या १० एकरातून ११३ कोटी रुपयांचे उत्पादन निघते त्यांना १०० रुपयांची माता भगिनींना दिली जाणारी भेट " निवडणूक जुमला"वाटेल असंही खोचक टीकाही बावनकुळेंनी सुप्रिया सुळेंवर केली आहे.
काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?
गॅस सिलेंडरचे दर १०० रुपयांनी कपात केल्याबद्दल पत्रकारांनी सुळेंना प्रश्न विचारला. त्यावर त्या म्हणाल्या होत्या की, ही तर सुरुवात आहे. निवडणूक आली आहे. यापुढे असे अनेक जुमले पाहायला मिळतील. इतके दिवस हजार रुपयांच्या वर गॅस सिलेंडर होता. तेव्हा त्यांना सुचलं नव्हते. परंतु लोकसभा निवडणूक आली तर १०० रुपयांनी कपात केली. द्यायचाच असेल ४०० रुपयांना गॅस सिलेंडर द्या अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली.