Maharashtra Elections 2024: विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. महायुतीला प्रचंड जनादेश मिळाला. २३० जागा जिंकत महायुतीने सत्ता कायम राखली असली, तरी मुख्यमंत्री कोण याची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. त्यातच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करावं, असा आग्रह करताना दिसत आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीत एक हैं तो सेफ है असा नारा दिला होता. त्यात बदल करत शिवसेनेच्या नेत्यांकडून 'एकनाथ है तो सेफ है', असे म्हटले गेले. त्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे.
'एक'नाथ हैं तो सेफ है', असे शिवसेना म्हणत आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "कुठलं कुठे जोडत आहात. पंतप्रधानांनी काय म्हटलं आहे की, एक आहे तर पूर्ण हिंदुस्थान सेफ आहे. एक आहोत, तर आपण सर्व सुरक्षित आहोत. पूर्ण देश आणि समाजासाठी हे म्हटलं गेलं", असे उत्तर देत बावनकुळे यांनी यावर अधिक बोलणं टाळलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा प्रचारावेळी एक हैं तो सेफ है असा नारा दिला होता. या घोषणेची संपूर्ण निवडणूक प्रचाराच्या काळात चर्चा झाली. भाजपकडून ध्रवीकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला गेला होता. पण, निकालानंतर भाजप-महायुतीला याचा फायदा झाल्याचे दिसून आले.
महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वात पुढे आहे. तर एकनाथ शिंदेंही पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यातच शिवसेनेच्या नेत्यांकडून शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा आग्रह केला जात आहे.