मुंबई – नाशिकहून मुंबईच्या दिशेने परतणाऱ्या मनसे नेते अमित ठाकरेंची कार सिन्नर येथील समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर अडवण्यात आली. याठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे अमित ठाकरेंना काही मिनिटे ताटकळत राहावे लागले. हा राग मनात धरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. मनसैनिकांनी केलेल्या या कृत्यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. अमित ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा अशा शब्दात भाजपाने ट्विटरच्या माध्यमातून अमित ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
भाजपाच्या या ट्विटवर मनसेने प्रत्युत्तर दिले आहे. परंतु भाजपाने केलेल्या ट्विटवर अनेक मनसे कार्यकर्त्यांसह नेटिझन्सचे भाजपाला जुन्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. स्वप्निल मोरे नावाच्या युझरने २०१४ चा संदर्भ देत सत्तेत आल्यावर आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू या आश्वासनाची आठवण करून दिली. तर अमोघ गायकवाड यांनी फास्टटॅगमध्ये बिघाड होता मग कार का अडवल्या जातात? टोलनाक्यावर तांत्रिक बिघाड होता. राजकीय मतभेद विसरून सामान्यांचा विचार करा. टोल चालकांची अरेरावी चालू आहे. कोणतेही नियम फॉलो केले जात नाही असं म्हटलं आहे.
तर राज फॅनक्लबने दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा २०१४ चा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात मुंडे म्हणाले होते की, टोलमुक्त महाराष्ट्र करा अशी मागणी महायुतीची आहे. जर तुम्ही टोलमुक्त महाराष्ट्र केला नाही तर आमचे सरकार आल्यास आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू आणि टोलच्या उत्पन्नाबाबत जे प्रश्न निर्माण होतील त्याबाबत आम्ही तज्ज्ञांची समिती नेमू, टोलला नवा पर्याय शोधू पण महाराष्ट्र टोलमुक्त करू असं २०१४ मध्ये सत्तेत येण्यापूर्वी भाजपाने म्हटलं होते.
त्याचसोबत आर. आर म्हात्रे या युझरने देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात महाराष्ट्रातील टोलमाफिया कुणाच्या जोरावर? असा प्रश्न केला होता. त्यावर फडणवीस म्हणतात की, महाराष्ट्रातल्या राज्य महामार्ग, ग्रामीण रस्ते आणि जिल्हा महामार्गांची अवस्था अत्यंत वाईट आहे. महाराष्ट्रात रस्त्यांचे नाही तर खड्ड्यांचे राज्य आहे. सामान्यांचे पैसे कुठे जातात? सरकारला केवळ टोलमध्ये रस आहे. टोलचा झोल असा की ठेकेदारच गाड्यांची नोंद ठेवतो, त्याचा आराखडा घेतो, ठेकेदार टेंडर तयार करतो आणि तोच ठेकेदार टेंडर भरतो. वर्षानुवर्षे सामान्य माणूस टोल भरत असतो. हा टोलचा झोल बंद करावा लागेल असं फडणवीस म्हणाले होते.