मुंबई – गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या २ ज्येष्ठ नेत्यांचा वाद चव्हाट्यावर आला आहे. या वादाचा परिणाम महायुतीवर पडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता भाजपाने या वादावर भाष्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सल्ला दिला आहे. जबाबदार नेत्यांमध्ये जाहीरपणे अशी वक्तव्ये होत असतील तर तळागळातील कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो असं भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.
आमदार प्रविण दरेकर म्हणाले की, रामदास कदम आणि गजानन किर्तीकर हे ज्येष्ठ नेते आहेत. शिवसेनेतील हा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु मी सहकारी पक्ष आणि हितचिंतक म्हणून सांगतो, अशाप्रकारे ज्येष्ठ नेत्यांचा बाहेर उघडपणे वाद होणे योग्य वाटत नाही. गजानन किर्तीकरांनी निवडणूक लढवणार नसल्याचे ऐकायला मिळाले होते. त्यामुळे स्वाभाविक ते लढणार नसतील तर पक्षातील एखाद्याने इच्छा प्रकट केली तर हा गुन्हा नाही. रामदास कदमांनी त्यांच्या पुत्रासाठी मागणी केली असेल तर त्यावर खुलेपणे प्रसारमाध्यमांमध्ये भांडणे चव्हाट्यावर आणणे योग्य वाटत नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रकाराची दखल घेऊन योग्य ती सूचना देतील. परंतु या वादामुळे कार्यकर्त्यांना आणि शिवसैनिकांना दिशा देण्यासाठी हे योग्य नाही. १०० टक्के महायुतीमध्ये हा चुकीचा मेसेज जातो. जबाबदार नेत्यांमध्ये जाहीरपणे अशी वक्तव्ये होत असतील तर तळागळातील कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.
काय आहे कदम-किर्तीकर वाद?
गजानन किर्तीकर हे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. परंतु २०२४ च्या निवडणुकीत या जागेवर रामदास कदम यांचे सुपुत्र सिद्धेश कदम इच्छुक आहेत. त्यावरून रामदास कदम आणि गजानन किर्तीकर यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. त्यात गजानन किर्तीकरांनी थेट कदमांवर गद्दारीचे आरोप केले. १९९० च्या निवडणुकीत त्यांनी मला पाडण्याचा प्रयत्न केला. त्याचसोबत कदम राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते असा गौप्यस्फोट केला. त्यावर पलटवार करताना रामदास कदमांनी माझ्या रक्तात भेसळ नाही. तुम्ही मुलाला निवडून आणण्यासाठी पक्षातील नेत्यालाच बदनाम करण्याचे कटकारस्थान रचताय असा आरोप कदमांनी केला.