ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - सरकारची लोकविरोधी धोरणे काँग्रेस पक्षाने चव्हाट्यावर आणल्यामुळे भाजपने देशभरातील काँग्रेस नेत्यांविरूद्ध राजकीय सूडबुद्धीने कारवाई सुरू केली आहे. अशी टीका काँग्रेस खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. ते गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
सीबीआयसारख्या तपास यंत्रणांवर दबाव आणून बिनबुडाच्या आरोपांखाली काँग्रेस नेत्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, या प्रकाराला काँग्रेस भीक घालणार नाही. काँग्रेस यापुढेही अधिक आक्रमकपणे शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत राहिल असेही ते म्हणाले. विरोधी पक्षातील नेत्यांवर बिनबुडाच्या आरोपांखाली कारवाई करण्याची तत्परता दाखविणारे हे सरकार भाजप नेत्यांच्या गैरव्यवहाराबद्दल मात्र चकार शब्द काढत नाही.
आदर्श गृहनिर्माण संस्था प्रकरणामध्ये माझे नाव आरोपपत्रातून वगळण्यासंदर्भात एक याचिका सर्वोच्च न्यायालयात विचाराधीन आहे. याबाबत सीबीआय व राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे नोटीससुद्धा दिलेली आहे. तरीही केवळ राजकीय आकसापोटी कायदेशीर पैलुंचा विचार न करता भाजप सरकारने सीबीआयवर दबाव आणून राज्यपालांना माझ्याविरूद्ध खटला चालविण्याची परवानगी मागण्यास भाग पाडले असा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला.
भाजप नेत्यांवरील आरोपांची साधी चौकशीही केली जात नाही. डाळ भाववाढ प्रकरण, नागपूर वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थीनीचे शोषण करण्याचा प्रकार, मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे विविध आरोप, खोटी शैक्षणिक प्रमाणपत्रे अशा विविध प्रकरणांमध्ये सरकारने आपल्या नेत्यांना विनाचौकशी क्लीन चीट दिली आहे. यातून भाजपची दुटप्पी भूमिका स्पष्ट होते असे म्हणाले