ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. 4 - उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने पहिल्याच कॅबिनेट बैठकीनंतर शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आधीच चर्चेत असलेल्या या मुद्द्याला आणखी बळ मिळालं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्जमाफीवरून सत्ताधारी भाजपाला चांगलेच धारेवर धरलं. पनवेलमध्ये विरोधकांच्या संघर्षयात्रेचा समारोप झाला, यावेळी बोलताना पवारांनी भाजपावर चौफेर टीका केली.
उत्तर प्रदेशमध्ये भाजपा सरकार कर्जमाफीची घोषणा करतं मग महाराष्ट्रातील शेतक-यांना का नाही असा सवाल करत दिलेला शब्द पाळायचा नाही हीच भाजपाची संस्कृती असल्याची खरमरीत टीका पवारांनी केली. यावेळी शेतक-यांसाठी कर्जमाफीची घोषणा करेपर्यंत आंदोलन करू आणि संघर्षयात्रा आणखी तीव्र करू, कर्जमाफीसाठी राज्यकर्त्यांचं जगणं हराम करून ठेवू असं पवार म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी शेतक-यांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केलं.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या पहिल्या बैठकीत कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला असून, राज्यातील शेतकऱ्यांचे एक लाखापर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. या कर्जमाफीचा लाभ उत्तर प्रदेशमधील ८६ लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे.
उत्तर प्रदेश निवडणुकीसाठीच्या आपल्या वचननाम्यात भाजपाने सत्तेवर आल्यास लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा भाजपाने केली होती. प्रत्यक्ष निवडणुकीतही भाजपाला याचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला होता. मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद करावी लागणार असल्याने भाजपा सरकार याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.