ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - 'बिहारमध्ये मोदींच्या नावाने निवडणूका लढण्यात आल्या, त्यामुळे हा पराभव म्हणजे मोदींचीच हार आहे' असे सांगत भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने भाजपाला चिमटा काढला आहे. जेव्हा काँग्रेसचा पराभव होतो तेव्हा पराभवाची जबाबदारी सोनिया गांधींची असते, तसेच आता बिहार निवडणूकीतील भाजपाच्या पराभवाची जबाबदारी नरेंद्र मोदींची आहे आणि त्यांनी ती स्वीकारली पाहिजे, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी हाणला.
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहार निवडणूकीत मतदारांनी महागठबंधनच्या बाजूने कौल दिला असून मोदींच्या नेतृत्वाखाली लढणा-या एनडीएला मतदारांनी साफ धुडकावून लावले आहे. महागठबंधनची स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू असून नीतिश कुमाच पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणाप असल्याचे या निकालांनंतर स्पष्ट झाले आहे. त्याच पार्श्वबूमीवर भाजप सरकारचा केंद्रातील व महाराष्ट्रातील सत्तेतील साथीदार असणा-या शिवसेनेने नीतिशकुमार यांचे अभिनंदन करतानाच भाजपाला चिमटे काढले आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नीतिशकुमार यांचे अभिनंदन करत हा ऐतिहासिक निकाल देशातील राजकीय भवितव्याला वेगळे वळण देणारा ठरेल असे सांगितले, तसेच या मोठ्या विजयामुळे राजकीय महानायक म्हणून नितीशकुमार यांचा उदय झाला आहे, असेही ते म्हणाले.
त्याचवेळी त्यांनी भाजपच्या पराभवाची मिमांसा करताना बिहारमध्ये भाजप हरली म्हणजे नरेंद्र मोदीच हरले असे सांगत मोदींनी पराभवाची जबाबादारी स्वीकारली पाहिजे, असा सल्ला भाजपाला दिला.