पणजी : संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचा गड असलेल्या पणजी महापालिकेच्या निवडणूक निकालाने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला धक्का दिला. भाजपा पुरस्कृत गटाने ३० पैकी केवळ १३ प्रभाग जिंकले. काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले सांताक्रूझचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या गटाची अपेक्षेप्रमाणे सरशी झाली. त्यांच्या पॅनलने १७ जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळविले. काँग्रेसने निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवार उभे करून नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना एकही जागा मिळाली नाही. पणजीचे भाजपा आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी पक्षाची ताकद पणाला लावून ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली होती. मात्र पणजीनजीकच्या सांताक्रूझ व ताळगाव विधानसभा मतदारसंघांवर जबरदस्त पकड असलेल्या मोन्सेरात यांनी पुन्हा महापालिकेवर वर्चस्व मिळविले. पणजी विधानसभा मतदारसंघातील २१ पैकी ११ जागा भाजपाने जिंकल्या. संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी शेवटचे दोन दिवस भाजपाला मते द्या, असे आवाहन त्यांनी केले होते. पण त्याचा परिणाम दिसून आला नाही. (खास प्रतिनिधी)
पणजी पालिकेत भाजपाचा पराभव
By admin | Published: March 09, 2016 5:53 AM