छोट्या राज्यांशिवाय संपूर्ण मानवी विकास अशक्य असल्याचे मत ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्रातील सरकार आपलं सरकार आहे. लाडकं सरकार आहे, असे सांगत मराठवाडा सोबत विदर्भही स्वतंत्र करू, असा दावाही त्यांनी सोलापुरात केला आहे. सदावर्ते यांनी वेगळा विदर्भ आणि वेगळा मराठवाड्याची मागमी केली आहे, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे नेते भास्कर जाधव यांनी वकील सदावर्ते यांच्यासह भाजपवर टीका केली आहे.
गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सोलापुरात शाई फेक; संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक
"वकील गुणरत्न सदावर्ते हे भाजपचे समर्थक आहेत. एसटी कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी केलेले आंदोलन आणि यासाठी त्यांना तुरुंगातही जावे लागले आहे. याअगोदर वेगळा विदर्भ आणि वेगळा मराठवाडा व्हावा अशी मागणी भाजपाने केली होती. आता हीच मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे, अशी टीका आमदार जाधव यांनी केली.
भाजप आपल्या लोकांकडून अशी मागणी करत आहे. सदावर्ते कधी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेतात, कधी भाजपचे कौतुक करतात, याचे षडयंत्र भाजपचेच आहे हे पाहणे गरजेचे आहे, असंही आमदार भास्कर जाधव म्हणाले.
गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सोलापुरात शाई फेक
सोलापुरमध्ये वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ झाला. सदावर्ते यांच्यावर मराठा आरक्षण आंदोलकांनी काळी शाई फेकली. आज सोलापुरमध्ये वकील गुणरत्न सदावर्ते पत्रकार परिषद घेत होते, यावेळी त्यांच्या अंगावर शाईफेक झाली आहे. यावेळी आंदोलकांनी मराठा आरक्षण संदर्भात घोषणा दिल्या आहेत.
यावेळी वकील सदावर्ते यांनी आंदोलकांचा निषेध केला. अशा शाईफेक हल्ल्यांना मी घाबरत नसल्याचे सदावर्ते म्हणाले. ही शाईफेक संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला. यावेळी त्यांनी माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली.