मुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आता भारतीय जनता पक्षाचे हायटेक कार्यालय उभारण्यात येणार आहे. पक्षाच्या विशेष प्रदेश बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. भाजपाची जिल्हा कार्यालये आजही आहेत, पण त्यात एकसारखेपणा नाही. आता कार्यालयाचा एक मॉडेल आराखडा तयार केला जाईल आणि तशीच कार्यालये सगळीकडे उभारण्यात येणार आहेत. त्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसह अत्याधुनिक सुविधा असतील. राज्यात सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी एकसारखी कार्यालये असणारा भाजपा हा पहिला पक्ष असेल. काही ठिकाणी पक्षाच्या मालकीच्या जागा नाहीत. तिथे जागांचा शोध आधीच सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. भाजपाच्या संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असून, डिसेंबर अखेर जिल्हा पातळीपर्यंतच्या निवडणुका पूर्ण करण्यात येणार आहेत. चांगल्या वातावरणात निवडणुका पार पाडण्याचे आवाहन दानवे यांनी केले. प्रदेश सहप्रभारी खा.राकेशसिंह, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही.सतीश आदींची भाषणे झाली. (विशेष प्रतिनिधी)
भाजपाची जिल्हा कार्यालये होणार हायटेक
By admin | Published: November 19, 2015 2:03 AM