शफी पठाण / नागपूर‘शत प्रतिशत भाजपा’ हे भारतीय जनता पार्टीचे स्वप्न असले तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपाच्या या स्वप्नात विघ्न घालण्याचा प्रयत्न करीत असल्याची आता या पक्षाच्याच कार्यकर्त्यांची भावना झाली आहे. जयपूर येथील सहित्य महोत्सवात बोलताना मनमोहन वैद्य यांनी जातीवर आधारित शासकीय नोकऱ्यांतील व शिक्षणातील आरक्षणाला विरोध केला. जातीवर आधारित आरक्षणामुळे भारतात फुटीरवाद वाढीस लागत असून, हे कुठल्याची देशाच्या हितासाठी चांगले नाही, असे डॉ. आंबेडकर यांनीच म्हटल्याचा दावाही त्यांनी केला आहे. दलितबहुल उत्तर प्रदेशसह इतरही चार राज्यांची निवडणूक पुढ्यात आहे व महाराष्ट्रातही नागपूर, मुंबईसह अनेक मोठ्या महानगरपालिकांमध्ये भाजपाचे नशीब डावावर लागले आहे, हे माहीत असतानाही वैद्य यांनी असे विधान केल्याने संघाला नेमके हवे तरी काय, असा प्रश्न भाजपाचे काही कार्यकर्ते खासगीत विचारत आहेत. संविधानात ज्या जातींसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे, त्यातील बहुसंख्य समाजबांधव आजही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून कोसोदूर आहेत. असे असताना वस्तुनिष्ठ विचार न करता सरसकट आरक्षण रद्द करण्याची भाषा वैद्य यांनी का वापरली असावी, यावरही भाजपात मंथन सुरू आहे. याआधीही बिहार विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी दस्तुरखुद्द सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीच आरक्षण समीक्षेसाठी समिती नेमण्याची मागणी केली होती. त्याचे परिणाम भाजपाला बिहारमध्ये भोगावे लागले. गोरक्षकांचा धुमाकूळ, रामजन्मभूमी, हिंदूची १० मुले यासारख्या विषयांवर प्रत्यक्ष संघ व भाजपातील संघवादी नेत्यांनी पक्षाची अनेकदा कोंडी केली आहे. आताही त्याचीच पुनरावृत्ती घडत असल्याने संघाची ही रणनीती भाजपाचे नुकसान करणार की पथ्यावर पडणार, हे निवडणुकीनंतरच कळेल.
भाजपाच्या स्वप्नात रा. स्व. संघाचे विघ्न की..?
By admin | Published: January 23, 2017 3:47 AM