यवतमाळ : जिल्हा सहकारी व अर्बन बँकांची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर भाजपानेही लक्ष केंद्रीत केले आहे. या बँकेवरील किमान ५० टक्के जागा मिळविण्यासाठी भाजपा आग्रही असून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीसोबत तडजोडी करण्याची तयारीही चालविल्याची चर्चा आहे. राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ पूर्वी सत्तरीत होते. ९७ व्या घटना दुरुस्तीनंतर या संचालक मंडळाची संख्या २१ वर आणण्यात आली. त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल आहे. त्यावर अद्याप ठोस निर्णय न झाल्याने राज्य बँकेच्या या निवडणुका थंडबस्त्यात आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून राज्य बँकेवर नाबार्डचे सेवानिवृत्त अधिकारी सुखदेवे हे प्रशासकीय अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत आहे. सेंट्रल बँकेचे निवृत्त अधिकारी तांबे आणि ग्रामीण बँकेचे चेअरमन या प्रशासकीय मंडळात आहे. यापूर्वी काही वर्ष अग्रवाल व सहानी या सनदी अधिकाऱ्यांनी राज्य बँकेचा कारभार सांभाळला. न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण प्रत्यक्ष निवडणूक घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महसूल विभागातून बँकेवर प्रतिनिधीही पाठविले गेले आहे. प्रत्यक्ष निवडणूक न करता संचालक बिनविरोध निवडण्याकडे भाजपाचा अधिक कल असल्याचे सहकार क्षेत्रातून सांगण्यात येते. राष्ट्रवादी मात्र आपले वर्चस्व सोडण्यास तयार नाही. काँग्रेसनेही या बँकेवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. न्यायालयात दाखल याचिकांचा तातडीने निकाल लागावा आणि निवडणुकीचा मार्ग सुकर व्हावा यासाठी भाजपाची सहकारातील इच्छुक नेते मंडळी सहकार मंत्र्यांना साकडे घालणार असल्याचे सांगण्यात येते.
राज्य बँकेवर भाजपाचा डोळा
By admin | Published: January 01, 2016 1:17 AM