- यदु जोशी, मुंबईकल्याण-डोंबिवलीतील महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार फिल्डिंग लावली असून, शिवसेनेला दूर ठेवत मनसेसह काँग्रेस-राष्ट्रवादी आणि इतरांना सोबत घेऊन महापौरपद मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेला बाजूला सारून भाजपाचा झेंडा फडकविण्यासाठी सगळेकाही करण्याची आम्हाला मुभा द्या, असे साकडे भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी काल रात्री उशिरा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना घातले. दानवे यांनी त्याला हिरवा झेंडा दाखविला असल्याचे सूत्रांनी सांगितले. कल्याणमध्ये दानवे व स्थानिक नेत्यांची मंगळवारी रात्री २ वाजेपर्यंत गुप्त बैठक झाली. तीत महापौरपदासाठीची रणनीती आखण्यात आली. मनसे कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेबरोबर जाणार नाही आणि शिवसेनेलाही मनसेशी युती करणे राजकीयदृष्ट्या सोईचे नाही. त्यामुळे मनसेचे १० नगरसेवक आपल्यासोबत येऊ शकतात. संघर्ष समितीचे चार नगरसेवक आपल्यासोबत येतील. त्यामुळे ५८ संख्याबळ होते. सत्ता स्थापन करण्यासाठी ६१ नगरसेवकांची गरज आहे. अपक्षांसह इतर तीन नगरसेवक सोबत येतील, असे गणित भाजपाच्या स्थानिक खासदार,आमदारांनी मांडले आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे भाजपाने पुढाकार घेतला तर आपला महापौर होऊ शकतो, असे स्थानिक नेत्यांचे मत आहे.सूत्रांनी सांगितले की, नैसर्गिक युतीचा विचार करून एकदा शिवसेनेशी चर्चा केली जाईल. मात्र, महापौरपदावर कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही. महापौरपद भाजपाला दिले तर चांगलेच आहे. ते राजी होणार नसतील तर संख्याबळाची मोट बांधून महापौरपद खेचून आणा, असे दानवे यांनी बैठकीत सांगितले. दानवे या संदर्भात आज रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत परतल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करतील. शिवसेनेला बाजूला ठेवून कल्याण-डोंबिवलीत महापौरपद मिळविले तर त्याचा राज्य सरकारच्या स्थैर्यावर परिणाम होईल का असा मुद्दा समोर आला आहे. मात्र, एका महापौरपदाच्या वादात शिवसेना राज्यातील सत्ता सोडणार नाही, असे भाजपाला वाटते. सत्तेतून बाहेर न पडण्याची भूमिका शिवसेना आमदारांच्या बैठकीत मंगळवारीच घेण्यात आली. दरम्यान, मनसेच्या दहा नगरसेवकांचा पाठिंबा शिवसेनेने घेतला तर त्याचे विपरित परिणाम मुंबईच्या राजकारणावर होऊ शकतात. मनसेविरोधाची शिवसेनेची धार कमी होईल आणि त्याचा फटका मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर होऊ शकतो. त्यामुळे कल्याणमध्ये सेनेकडून मनसेची मदत घेतली जाणार नाही, असे भाजपा नेतृत्वाला वाटते.लक्ष्मीपूजनाला केली जाणार निवडमहापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ११ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता महापौर निवडला जाणार असून, याच वेळी उपमहापौरपदाची निवडही केली जाणार आहे. त्यासाठी ७ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. अर्ज दाखल करावयास अवघा तीन दिवसांचा कालावधी उरला असून उमेदवारी दाखल कोण करणार, याबाबत उत्सुकता आहे.काँग्रेस-राष्ट्रवादीशी संपर्क : भाजपाच्या कल्याण-डोंबिवलीतील नेत्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांशी आधीच संपर्क साधला आहे. त्यांचे अनुक्रमे चार आणि दोन नगरसेवक असून ते त्यापैकी बहुतेक आपल्यासोबत येऊ शकतात, असे भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी राज्य नेतृत्वाला सांगितले आहे.घोडाबाजार होऊ शकतोभाजपा आणि शिवसेना या दोघांना कोणत्याही परिस्थितीत महापौरपद हवे असल्याने घोडेबाजाराला ऊत येण्याची शक्यता आहे. विविध आमिषे दाखवून अपक्ष आणि लहान पक्षांच्या नगरसेवकांना गळाला लावले जावू शकते.
भाजपाची फिल्डिंग!
By admin | Published: November 05, 2015 3:33 AM