- लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशकात होत असलेल्या शिवसेनेच्या विभागीय कृषी अधिवेशनावर भारतीय जनता पक्ष लक्ष ठेवून असून, पक्षाकडून काढण्यात येणाऱ्या संवाद यात्रेत सेनेच्या टीकेला उत्तर देण्याची तयारी भाजपाने केली आहे. शिवसेना नेत्यांच्या राज्यव्यापी अभियानानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना आता विभागनिहाय अधिवेशन घेणार असून, त्याची सुरुवात नाशिक येथून होत आहे. उद्या होत असलेल्या या अधिवेशनात शिवसेना नेमकी काय भूमिका घेते याची उत्सुकता लागून आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्वप्नवत प्रकल्प असून, या प्रकल्पात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाआड शिवसेना मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्याची शक्यता आहे. शिवाय, भाजपाचे मित्रपक्ष असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी उपस्थित राहणार आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत यांनी प्रसिद्धीमाध्यमांना अधिवेशनाची माहिती देताना भाजप व राज्य सरकारवर निशाणा साधत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती न दिल्यास विधिमंडळ अधिवेशनावर लॉँगमार्च काढण्याचा इशाराही दिला होता.
शिवसेनेच्या अधिवेशनावर भाजपाचे लक्ष
By admin | Published: May 19, 2017 1:20 AM