BJP Meeting : मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या अनेक बैठका सुरु आहेत. तसंच, प्रत्येक पक्षाकडून दावे-प्रतिदावे केले जाऊ लागले आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच भाजपच्या कोअर कमिटीच्या नेत्यांची बैठक पार पडली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार झाली. भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला भूपेंद्र यादव, विनोद तावडे उपस्थित होते. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यात आली. या बैठकीत विधानसभा निवडणूक, जागावाटप, जागांची निवड यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी आशिष शेलार यांनी बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, त्याबद्दल सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, राज्यात भाजपचे जिल्हा विस्तारित कार्यकारी अधिवेशन लवकरच पार पडणार आहे. आगामी निवडणुका समोर ठेवून कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे. राज्यातील २८८ जागांवर, मंडल युनिटवर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गाव पातळीवर योजना सुरु केल्या जातील. तसंच येत्या १५ दिवसात हा कार्यक्रम नियोजित करण्यात येईल, असं आशिष शेलार यांनी सांगितलं.
याचबरोबर, विधानसभेसाठी जागा निश्चित करणं, आता सुरु करायला हवं. त्याचा फॉर्म्युला निकष, जागांची वाटप, त्याची निश्चिती केली आहे. लवकरच त्याचं वाटप होईल. त्यासोबतच लवकरच जागावाटपाची चर्चा सुरु होईल, असं आशिष शेलार म्हणाले. याशिवाय, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिन्ही नेते निवडणुकांच्या पुढच्या नियोजनाबद्दल भाष्य करतील, असेही आशिष शेलार यांनी सांगितलं.
दरम्यान, गेल्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळाली होती. यात महाविकास आघाडीनं राज्यातील ४८ जागांपैकी ३१ जागांवर दणदणीत विजय मिळवला. तर महायुतीच्या वाट्याला फक्त १७ जागा मिळाल्या. त्यामुळं लोकसभा निवडणूकीत फटका बसल्यानंतर आता महायुतीकडून आगामी विधानसभा निवडणुकीचे प्लॅनिंग सुरू करण्यात येत आहे.