खालापूर : अनेक मुंबईकर गणपतीसाठी कोकणात व अन्यत्र जाण्यासाठी निघाल्याने मंगळवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर वाहनांची गर्दी झाली. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. टोलनाक्यावर कोंडी झाली होती. एक्स्प्रेस-वेवर ठिकठिकाणी वाहतूक पोलीस वाहतूक नियंत्रित करताना दिसत होते.गुरुवारी गणेश चतुर्थी असल्याने कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांची संख्या मोठी होती. मुंबई-गोवा व मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर त्यामुळे वाहनांची गर्दी होती. मुंबई-गोवा हायवे अरुंद असून, अनेक ठिकाणी खड्डे असल्याने वाहतूक कोंडीचा फटका बसतो. गेली काही वर्षे कोकणात जाणारे भाविक मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेचा वापर करतात. या मार्गाने कराड, सातारा किंवा कोल्हापूर येथून कोकणात जाता येते. हे अंतर मोठे असले तरी रस्ता चांगला असल्याने या रस्त्याला पसंती दिली जात आहे. त्यामुळे मंगळवारी एक्स्प्रेस-वेवर वाहनांची गर्दी होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. कोकणातील अनेक भाविकांनी या वर्षी रेल्वेने गावाला जाणे पसंत केल्याने रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी झाल्याचे महामार्ग वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय बारटक्के यांनी सांगितले. वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून, कोकण परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस सज्ज आहेत. (वार्ताहर)‘अवजड’ बंदी कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. प्रवास सुखकर व्हावा यासाठी मुंबई-गोवा हायवेवर ठिकठिकाणी वाहतूक पोलीस तैनात आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर कळंबोली, कोनफाटा, शेडुंग व खालापूर टोलनाक्यावर वाहतूक पोलीस प्रवाशांना मदत करत आहेत. दिवस-रात्र हा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, पुढील तीन दिवस गोवा हायवेवर अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक अजय बारटक्के यांनी दिली.
मालवण नगरपरिषदेवर भाजपचा मोर्चा
By admin | Published: September 16, 2015 12:39 AM