माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांनी पुण्यातील येरवड्याच्या सरकारी जागेसंदर्भात केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. सरकारी जागा खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला व त्यासाठी आपल्यावर दबाव आणला होता, असा गंभीर आरोप बोरवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव न घेता केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या तापलं आहे.
पुण्यातील येरवडा कारागृहाशेजारी पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित असलेली तीन एकर जमीन अजित पवारांनी एका खासगी बिल्डरला देण्याचा आग्रह केल्याचा उल्लेख मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. अजित पवारांचे थेट नाव न घेता, त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री 'दादा' असा उल्लेख पुस्तकात केला आहे. अजित पवारांवर होत असलेल्या आरोपावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवारांवर केलेल्या आरोपांमागे भाजपाचा हात असावा, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. भाजपा नेहमी ताकदवान नेत्यांना कमकुवत करण्याचं राजकारण करते, असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला आहे. अजित पवारांची जी लोकांमध्ये इमेज आहे, त्याला धक्का देण्याचं काम केलं जातंय. भाजपाकडून अजितदादांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे.
अजित पवार काय म्हणाले?
आज पत्रकार परिषद घेत अजित पवारांनी बोरवणकर यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले. यावेळी त्यांनी २००८ साली शासनाने काढलेला एक जीआर सादर केला. संबंधित प्रस्ताव गृह विभागाचा होता, त्याच्याशी माझा काय संबध? त्यावेळी गृह विभागाचे मंत्री आर आर पाटील होते. मी आणि माझे काम, असा माझा स्वभाव आहे. रिटायर्ड पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांशी माझा काही संबंध नाही. माझा स्वभाव जरी कडक असला तरी मी राज्यातल्या अधिकाऱ्यांशी व्यवस्थितपणे बोलतो. अजित पवार पुढे म्हणतात, गेल्या ३ ते ४ दिवसांपासून माझ्याविरोधात बातम्या येत आहेत. मी त्याला महत्त्व दिले नाही. माझा त्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. मी अनेकवर्षे पालकमंत्री होतो, कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या कोणत्याही गोष्टी कधीही केल्या नाहीत. एखाद्याचे काम होत नसेल, तर मी त्याला तोंडावर नाही होत म्हणून सांगतो, पण चुकीचे काही काम करत नाही, अशी स्पष्टोक्ती अजित पवारांनी केली.