ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 23 : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाने स्वबळावर जोरदार मुसंडी मारत ६७ पैकी ३३ जागा जिंकल्या आहेत. भाजपाला बहुमतासाठी आता केवळ एका जागेची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला असला तरी या पक्षाला फक्त १६ जागा मिळाल्या तर स्वबळावर सत्ता स्थापनेची भाषा करणाऱ्या शिवसेनेला फक्त १४ जागा मिळाल्या. काँग्रेसला फक्त ४ जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान, बहुमतासाठी आवश्यक असलेल्या एका जागेसाठी भाजपा कुणाला सोबत घेते याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. जिल्हा परिषदेत भाजपाने सर्वच्या सर्व ६७ जागा लढविल्या होत्या. भाजपा व शिवसेना हे दोन्ही पक्ष जिल्हा परिषदेची निवडणूक गेल्या चार पंचवार्षिकपासून स्वबळावर लढवित आहे. निवडणुकीनंतर दोन्ही पक्ष एकत्र येतात आणि सत्ता मिळवितात. यंदा मात्र भाजपाने शिवसेनेला धोबीपछाड दिली आहे आणि स्वबळावर ३३ जागा मिळविल्या आहेत. माजी मंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली ही निवडणूक लढविण्यात आली. केवळ जिल्हा परिषदेतच नव्हे तर जिल्ह्यातील १५ ही पंचायत समित्यांमध्येही भाजपाने १३४ पैकी सर्वाधिक ६६ जागा मिळविल्या. त्या खालोखाल राष्ट्रवादी ३२, शिवसेना २६, काँग्रेस ६ व अपक्षांनी ४ जागा पटकावल्या. नेत्यांनी वर्चस्व राखलेजलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यात भाजपाने जि.प.च्या ७ पैकी ५ जागा मिळविल्या तर पंचायत समितीत १४ पैकी १० जागा मिळवित वर्चस्व कायम राखले. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यात भाजपाने जि.प.च्या सर्वच्या सर्व ४ जागा जिंकल्या. पंचायत समितीतही ८ पैकी ६ जागा जिंकत वर्चस्व राखले. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ३ पैकी २ जागा तर पंचायत समितीत ६ पैकी ५ जागा जिंकत शिवसेनेने वर्चस्व कायम राखले.
जळगाव जिल्हा परिषदेत भाजपाची मुसंडी
By admin | Published: February 23, 2017 4:11 PM