पुणे - बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्यासुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजप कडून दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल लढणार आहेत. भारतीय जनता पक्षातर्फे रात्री उशिरा त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.विशेष म्हणजे आमदार कूल हे राष्ट्रीय समाज पक्षातर्फे निवडून आले आहेत. मात्र कांचन कुल यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात थोडक्या मतांनी पराभूत झाले महादेव जानकर यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे जानकर यांनी भाजपच्या चिन्हावर न लढत रासपचसाठी ही जागा मागितली होती. कांचन कुल या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्या जवळचे नातेवाईक आहेत. वडगाव निंबाळकर येथील मूळ रहिवासी आहे. गेल्या निवडणुकीत दौंड विधानसभा मतदारसंघात सुळे या 25 हजार मतांनी पिछाडीवर गेल्या होत्या.
सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सुळे ८० हजार मतांच्या आघाडीने विजयी झाल्या होत्या. सुळे यांचे मताधिक्य घटल्याने राष्ट्रवादीची चिंता वाढली होती. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी कपबशीच्या चिन्हावर दौंड, पुरंदर व खडकवासला मतदारसंघातून मोठी आघाडी घेतली होती. सुळे यांना बारामती, इंदापूर व भोर मतदारसंघांमध्ये मताधिक्य मिळाले होते.