भाजपच्या 'कर्नाटक पॅटर्न'ला काँग्रेस आमदाराचा 'खो' ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 15:08 IST2019-11-09T15:08:45+5:302019-11-09T15:08:53+5:30
भाजपने कर्नाटकमधील जेडीएस आणि काँग्रेसचे आमदार फोडून तिथे भाजपचे सरकार स्थापन केले. त्यावेळी कुमारस्वामी यांचे सरकार पाडण्यासाठी भाजपने ऑपरेश लोट्स ही मोहीम राबविली होती.

भाजपच्या 'कर्नाटक पॅटर्न'ला काँग्रेस आमदाराचा 'खो' ?
मुंबई - राज्यात सत्तास्थापनेवरून वाढलेला पेच आणि शिवसेनेला दूर ठेवून सत्ता स्थापन करण्याचा बेत भाजपने आखल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. कर्नाटक पॅटर्न राबवून राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांना फोडून सत्तास्थापन्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र या प्रयत्नांना काँग्रेसचे इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांनी खो दिला आहे.
भाजपच्या काही नेत्यांनी संपर्क साधून चर्चेसाठी तुम्हाला मुंबईला यायचं, असा निरोप मिळाल्याचा दावा करून खोसकरांनी खळबळ उडवून दिली आहे. मात्र निरोप देणाऱ्याचे नाव खोसकरांनी उघड केले नाही. तसेच आपण काँग्रेससोबतच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजपने फोडाफोडीस उत्तर महाराष्ट्रापासून सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
याच वर्षी भाजपने कर्नाटकमधील जेडीएस आणि काँग्रेसचे आमदार फोडून तिथे भाजपचे सरकार स्थापन केले. त्यावेळी कुमारस्वामी यांचे सरकार पाडण्यासाठी भाजपने ऑपरेश लोट्स ही मोहीम राबविली होती. अशीच मोहीम भाजप महाराष्ट्रातही राबविणार, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील राज्यात नवीन सरकार स्थापन करणार असल्याचा दावा केला होता. यावेळी त्यांनी युतीचचं सरकार येईल असा उल्लेख टाळला होता. मात्र राज्यात भाजपच्या ऑपरेशन लोट्सला सुरुवातीला काँग्रेस आमदाराकडून खो मिळाल्याची चर्चा आहे.