भाजपाचे लोढा सर्वात श्रीमंत, तर मंत्री बावनकुळे गरीब!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 05:24 AM2018-09-19T05:24:42+5:302018-09-19T06:54:56+5:30
आमदारांचे वार्षिक सरासरी उत्पन्न ४३ लाख: लक्ष्मीशी सरस्वतीचे दूरचे नाते
मुंबई : गेल्या निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेलेल्या आमदारांचे स्वघोषित सरासरी वार्षिक उत्पन्न प्रत्येकी ४३.४ लाख रुपये एवढे आहे. देशाचा विचार केला आमदारांचे सरासरी वार्षिक उत्पन्न २४.४९ लाख रुपये आहे. भाजपाचे आ. मंगलप्रभात लोढा यांचे वार्षिक उत्पन्न सर्वाधिक म्हणजे ३३ कोटींवर असून, सर्वात कमी उत्पन्न असणाऱ्यांमध्ये भाजपाचे सुरेश खाडे (३८ हजार रुपये) तर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (६३ हजार रुपये) हे आहेत.
महाराष्ट्रातील आमदार अन्य राज्यांच्या तुलनेत जवळपास दुप्पट श्रीमंत आहेत. महाराष्ट्रातील आमदारांचा श्रीमंतीमध्ये कर्नाटकखालोखाल क्रमांक लागतो. कर्नाटकमधील आमदारांचे वार्षिक सरासरी उत्पन्न १ कोटी ११ लाख रुपये आहे. देशभरातील ४,०८६ पैकी ३,१४५ विद्यमान आमदारांनी उमेदवारी अर्जांसोबत सादर केलेल्या स्वघोषित उत्पन्नाचे ‘नॅशनल इलेक्शन वॉच’ व ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म््स’ यांनी विश्लेषण करून हा अहवाल प्रसिद्ध केला. महाराष्ट्रातील २८८ पैकी २५६ आमदारांचे मिळून एकूण उत्पन्न १११.१५ कोटी रुपये आहे. यावरून प्रत्येक आमदाराचे सरकारी वार्षिक उत्पन्न ४३.४ लाख रुपये येते. यात आमदाराच्या पत्नी/ पतीचे वा कुटुंबातील अन्य सदस्यांचे उत्पन्न धरलेले नाही. देशातील ९४१ आमदारांनी उत्पन्नाची माहिती जाहीर न केल्याने या विश्लेषणात ती यात नाही. महाराष्ट्रातील २५ आमदारांनी उत्पन्न जाहीर केले नसून, त्यापैकी १३ भाजपाचे आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्रत्येकी चार असून, इतर पक्षांचे पाच आहेत.
देशातील श्रीमंत २० आमदारांमध्ये महाराष्ट्रातील चार
क्रमांक २- मंगलप्रभात लोढा मलबार हिल, भाजपा. उत्पन्न :३३.२४ कोटी रु. व्यवसाय : नोकरी
क्रमांक ६- दिलीप गंगाधर सोपल बाशी, राष्ट्रवादी. उत्पन्न : ९.८५ कोटी रु. व्यवसाय : वकिली, शेती
क्रमांक १७- प्रशांत ठाकूर, पनवेल, भाजपा. उत्पन्न : ५.४१ कोटी व्यवसाय : शेती व यंत्रसामुग्री भाड्याने देणे
क्रमांक २०- पृथ्वीराज चव्हाण, कराड (दक्षिण). काँग्रेस. उत्पन्न: ४.३४ कोटी रु. व्यवसाय : शेती
शिक्षण व उत्पन्नाचे व्यस्त गुणोत्तर
अशिक्षित : सरासरी उत्पन्न ९.३१ लाख रु.
पाचवी ते १२ वी पास : सरासरी उत्पन्न ३१.३ लाख
आठवी पास : सरासरी उत्पन्न ८९.८८ लाख
पदवीधर वा अधिक : सरासरी उत्पन्न २०.८७ लाख