मुंबई - माजीमंत्री आणि भाजपनेते राम शिंदे यांनी नगर जिल्ह्यात भाजपला झालेल्या नुकसानीची खंत व्यक्त केली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा फायदा नव्हे तर तोटाच अधिक झाल्याचे म्हटले.
याआधीही शिंदे यांनी विखे पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वीच विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना भाजपकडून मंत्रीपदाची संधी मिळाली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातून भाजपला केवळ तीनच जागा जिंकता आल्या. 2014 मध्ये भाजपने नगरमधून 5 जागांवर विजय मिळवला होता.
शिंदे म्हणाले की, निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात आलेल्या अडचणींविषयी प्रदेश प्रतिनिधींकडे तक्रार केली आहे. जिल्ह्यात पूर्वी भाजपचे पाच आमदार होते. विखे आणि वैभव पिचड आल्यानंतर ही संख्या 7 व्हायला हवी होती. मात्र प्रत्येक्षात ही संख्या तीनवर आल्याचे शिंदे म्हणाले. त्यामुळे विखे फॅक्टर काहीही उपयोगी पडला नसल्याचे शिंदे म्हणाले. खुद्द शिंदे विधानसभेला पराभूत झाले आहेत.
दरम्यान भाजप प्रवेशानंतर विखे पाटील यांनीच भाजपला नगरमधील सर्व 12 जागा जिंकून देऊ अशी घोषणा केली होती. मात्र मतदारांनी विखेंच्या मनसुब्यावर पाणी फेरले. त्यातच आता विखे पिता-पुत्रांनी पक्षविरोधी काम केल्याचे आरोप होत आहेत.