सोलापूर : राज्य सरकारच्या पाच वर्षांतील कामांचा लेखाजोखा मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप रविवारी सोलापुरात होत आहे. यानिमित्त इंदिरा गांधी स्टेडियमवर रविवारी सायंकाळी सहा वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती भाजपचे संघटनमंत्री रघुनाथ कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
कुलकर्णी म्हणाले, महाजनादेश यात्रेला मोझरी (जि. अमरावती) येथून सुरुवात झाली होती. पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि महाराष्टÑातील १० जिल्ह्यातील ३९ मतदारसंघातून प्रवास करण्यात आला. दुसºया टप्प्यात १४ जिल्ह्यातील ५० विधानसभा मतदारसंघाचा प्रवास करण्यात आला. रविवारी सोलापुरात या यात्रेचा समारोप होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल.
जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रद्द केल्यानंतर अमित शहा यांचा महाराष्टÑातील पहिलाच दौरा आहे. त्यामुळे या यात्रेला वेगळेच महत्त्व प्राप्त झाल्याचा दावा कुलकर्णी यांनी केला. रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला तुळजापूर नाक्यावर यात्रेचे आगमन होईल. जुना पुणे नाका येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर ही यात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचेल. पार्क स्टेडियमच्या मैदानावर सायंकाळी सहा वाजता जाहीर सभा होईल.
यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख आदी उपस्थित होते.
पार्क मैदान परिसरात कडक सुरक्षा- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला सोलापूर विमानतळावर आगमन होणार आहे. मुख्यमंत्र्यांची यात्रा पार्क मैदानावर पोहोचेपर्यंत ते शासकीय विश्रामगृहात थांबणार आहेत. शासकीय विश्रामगृह आणि पार्क स्टेडियम परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख, शहाजी पवार, विक्रम देशमुख यांनी मैदानावरील तयारीचा आढावा घेतला.
राजकीय प्रवेश नाहीत- महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमात राज्यातील अनेक नेते भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, महाजनादेश यात्रेत आजअखेर एकही प्रवेश झालेला नाही. पण पक्षाने ठरविले तर समारोप कार्यक्रमात प्रवेशाचा कार्यक्रम होऊ शकतो. पण अद्याप निरोप आलेला नाही.