ओबीसी आरक्षणप्रश्नी भाजपचा मोर्चा म्हणजे नौटंकी, नाना पटोलेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 04:19 PM2022-05-25T16:19:10+5:302022-05-25T16:25:13+5:30

Nana Patole : बुधवारी ओबीसी आरक्षणासाठी भाजपने मंत्रालयावर काढलेला धडक मोर्चा काढला. यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी हल्लाबोल केला आहे.

BJP's march on OBC reservation issue is a gimmick, Nana Patole's attack | ओबीसी आरक्षणप्रश्नी भाजपचा मोर्चा म्हणजे नौटंकी, नाना पटोलेंचा हल्लाबोल

ओबीसी आरक्षणप्रश्नी भाजपचा मोर्चा म्हणजे नौटंकी, नाना पटोलेंचा हल्लाबोल

Next

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायलयाने दिले आहेत. त्यात मध्य प्रदेश सरकारने ओबीसी आरक्षणाला मंजुरी दिल्यानंतर महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. याच मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारी ओबीसी आरक्षणासाठी भाजपने मंत्रालयावर काढलेला धडक मोर्चा काढला. यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी हल्लाबोल केला आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपने मंत्रालायावर काढलेला मोर्चा हे निव्वळ ढोंग आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार राज्यात असतानाच ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्याची सुरुवात झाली आणि त्याला केंद्रातील भाजप सरकारने साथ दिली हे उघड सत्य आहे. त्यामुळे भाजपला ओबीसींच्या आरक्षणावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही. आरक्षण संपवणे हेच भाजप व आरएसएसचा अजेंडा असून मंत्रालयावरील भाजपाचा मोर्चा म्हणजे केवळ नौटंकी आहे. ओबीसींना आरक्षण मिळावे असे भाजप नेत्यांना वाटत असेल तर त्यांनी पंतप्रधान कार्यालयावर मोर्चा काढावा, असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला आहे.

नाना पटोले म्हणाले की, मोर्चावेळी भाजप नेत्यांनी केलेली विधाने ही अत्यंत हास्यास्पद होती. सत्तेच्या लालसेने पछाडलेल्या चंद्रकांत पाटील यांनी लोकांना मसनात पाठवण्याची भाषा केली, ही मग्रुरी असून भाजपचे लोकच अशी भाषा वापरू शकतात. ओबीसी आरक्षण संपुष्टात येण्याची सुरुवात झाली, तीच मुळी २०१७ साली. नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका फडणवीस सरकारने एक साधे परिपत्रक काढून पुढे ढकलल्या आणि प्रकरण चिघळले. नंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यादरम्यान ओबीसी आरक्षण वाचावे म्हणून फडणवीस सरकारने कोणतीही हालचाल केली नाही. पाच वर्षे फडणवीस सरकारने झोपा काढल्या आणि आता मात्र ओबीसी आरक्षणाचे खापर महाविकास आघाडीवर फोडू पहात आहेत.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, हीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि त्यासाठी महाविकास आघाडी सरकारही प्रयत्नशील आहे. विधानसभेचा अध्यक्ष असताना  मी स्वत: जातीनिहाय जनगणना करावी असा ठराव मांडून तो संमत करून घेतला. जातीनिहाय जनगणना झाली तर असे वाद निर्माणच होणार नाहीत. परंतु केंद्रातील भाजप सरकार त्यावर निर्णय घेत नाही. ओबीसी आरक्षणाच्या आजच्या परिस्थितीस भाजपच जबाबदार आहे. धनगर समाजाला पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षण देण्याचे आश्वासन देणारा व नंतर पाच वर्ष त्यांना झुलवत ठेवणारा पक्षही भाजपच आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे ही भाजप सोडता सर्व राजकीय पक्षांची भूमिका आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा खरा मारेकरी भाजपच असून आता आंदोलन करत 'मगरीचे अश्रू' ढाळत आहे, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.

Web Title: BJP's march on OBC reservation issue is a gimmick, Nana Patole's attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.