मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात मेगाभरती घेण्यात आली होती. शिवसेनेची मदत न घेता स्वबळावर सरकार स्थापन करण्याचा भाजपचा इरादा होता. त्याला विरोधी पक्षनेत्यासह अनेक राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी साद देत भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु, यापैकी अनेक नेत्यांना जनतेने घरचा रस्ता दाखवला. तर निवडून आलेल्या नेत्यांपासून भाजप दुरावा ठेवत असल्याचे पाहायला मिळत आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह नारायण राणे, मधुकर पिचड, गणेश नाईक, उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले, विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांना भाजपमध्ये प्रवेश दिला. परंतु, या नेत्यांना आता निवडणुकीच्या निकालानंतर भाजपमध्ये फारस महत्त्व मिळत नसल्याचे चित्र आहे. खुद्द विखे पाटील पुन्हा काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळातच राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घाई केली होती. त्यांना प्रवेशही मिळाला. मात्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राणे यांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी आपण सहकार्य करणार असून फडणवीसांनी आपल्यावर ही जबाबदारी सोपविल्याचं त्यांनी नमूद केले होतं. त्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने प्रतिक्रिया देत ते त्यांचं व्यक्तगत मत असल्याचे सांगत राणेंना दूर सारण्याचा प्रयत्न केला.
दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटीलही भाजपच्या पत्रकार परिषदा किंवा इतर बैठकांमध्ये फारसे दिसत नाहीत. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यात युतीला 12-0 असा विजय मिळवून अशी वल्गना केली केली होती. मात्र आघाडीने नगरमध्ये मुसंडी मारत 9-3 असा विजय मिळवला. कदाचित त्यामुळेच विखे पाटील यांच्यापासून भाजप अंतर ठेवत आहे. याचप्रमाणे मधुकर पिचड, गणेश नाईक, उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले, विजयसिंह मोहिते पाटील हे देखील भाजपसोबत दिसत नाहीत. एकूणच मेगाभरतीतील नेत्यांपासून भाजप अंतर राखत असल्याचे दिसून येत आहे.