यदु जोशी / मुंबईनिवडणूक होत असलेल्या राज्यातील १० महापालिकांपैकी किमान ७ महापालिकांमध्ये नंबर १चा पक्ष बनण्याचे आणि ४ ते ५ महापालिकांमध्ये स्वबळावर सत्तेत येण्याचे लक्ष्य भारतीय जनता पार्टीने निश्चित केले आहे. तथापि, बंडखोरी आणि अंतर्गत वादाचे आव्हानही पक्षासमोर आहे. ज्या ७ महापालिकांवर भाजपाने नंबर १साठी लक्ष केंद्रित केले आहे, त्यात नागपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अमरावती व उल्हासनगर या महापालिकांचा समावेश असल्याचे पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले. नगरपालिकांमध्ये मिळालेल्या यशानंतर आता मोठ्या शहरांमध्ये सत्ता मिळविण्यासाठी भाजपा संपूर्ण शक्ती पणाला लावणार आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणनीती आखली आहे. मुंबई आणि ठाण्यामध्ये युती झाली वा नाही झाली, तरी शिवसेना नंबर १चा पक्ष असेल, याची भाजपाच्या नेतृत्वाला कल्पना आहे. अकोलामध्ये अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील भारिप-बहुजन महासंघ आणि काँग्रेस यांची नगरपालिकांप्रमाणे युती झाली, तर भाजपासाठी ती डोकेदुखी ठरू शकेल. अकोल्याच्या स्थानिक राजकारणात राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील विरुद्ध खा. संजय धोत्रे हे दोन गटांत समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तरीही दोघांपैकी जो नेता सहकार्य करणार नाही, त्याला बाजूला सारून प्रचार यंत्रणा राबविली जाण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्ये सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि राज्यमंत्री विजय देशमुख यांच्यात फारसे सख्य नाही, पण महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपसातील मतभेद बाजूला सारून एक व्हा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोघांनाही बजावले आहे. नाशिकमध्ये युती झाली, तर भाजपा-शिवसेनेची सत्ता निश्चित येईल, पण झाली नाही, तरी शिवसेनेपेक्षा जास्त जागा जिंकून महापौरपद ताब्यात आलेच पाहिजे, असा भाजपाचा प्रयत्न आहे. पिंपरी-चिंचवडमधील लढाई ही आता राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध मुख्यमंत्री फडणवीस अशी झाली आहे. या शहरात राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी केला आहे. नागपूरमध्ये एकेका जागेसाठी तीस-चाळीस इच्छुक असल्याने, बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता असल्याने तिकीटवाटप ही भाजपासाठी मोठी डोकेदुखी बनली आहे. नागपूरखालोखाल नाशिकमध्ये बंडखोरांचे मोठे आव्हान असू शकेल. स्वपक्षीय इच्छुक आणि मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपात आलेले नगरसेवक, कार्यकर्ते यांचे समाधान होईल, असे तिकीटवाटप करण्याची प्रचंड कसरत भाजपाला करावी लागणार आहे. अमरावतीमध्ये राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील आणि अमरावतीचे आमदार डॉ. सुनील देशमुख यांच्यात फारसे सख्य नसणे, ही पक्षासाठी चिंतेची बाब असेल.नगरपालिकांमध्ये मिळालेल्या यशानंतर आता मोठ्या शहरांमध्ये सत्ता मिळविण्यासाठी आगामी निवडणुकीत भाजपा संपूर्ण शक्ती पणाला लावणार आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी रणनीती आखली आहे. ज्या सात महापालिकांवर भाजपाने नंबर वनसाठी लक्ष केंद्रित केले आहे, त्यात नागपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अमरावती व उल्हासनगर या महापालिकांचा समावेश असल्याचे पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले.
भाजपाच्या मिशनला बंडखोरीची भीती
By admin | Published: January 13, 2017 4:01 AM