- हरिश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांतील सत्ता राखण्यात यशस्वी ठरलेल्या भाजपची नजर आता महाराष्ट्र या महत्त्वाच्या राज्यावर वळली आहे. २०२२ अखेर होणाऱ्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीआधीच महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याचा भाजपच्या आक्रमक श्रेष्ठींचा इरादा आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियुक्ती केल्याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आलेख कैकपटीने उंचावला आहे.गोव्यात कोणत्याही अडचणीशिवाय सरकार स्थापन करण्याची जबाबदारी भाजप श्रेष्ठींनी राज्यसभा सदस्य सी. एम. रमेश यांच्यावर सोपविली. ते सध्या पणजीत ठाण मांडून आहेत. भाजपला विनाअट पाठिंबा देण्यासाठी चार अपक्ष आणि अन्य आमदार त्यांच्या खोलीबाहेर रांग लावून आहेत. २८८ सदस्य असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत भाजपचे १०५ सदस्य असून, अन्य १७ आमदारांचा पाठिंबा मिळविण्यास भाजप सक्षम आहे. भाजपला २८ आमदरांच्या पाठिंब्याची गरज आहे. भ्रष्टाचारामुळे राज्याचे नुकसान होऊ नये अशी भाजपची भूमिका आहे.
चाैकशीचा ससेमिराया राज्यातील सत्तारूढ आघाडीतील प्रत्येक पाचवा आमदार सीबीआय, ईडी, प्राप्तिकर किंवा अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या चौकशीला सामोरे जात असून, यातून दिलासा कसा मिळेल, यादृष्टीने विचार करीत आहेत.
सत्तावाटपाच्या सूत्रावर चर्चाशिवसेनेचे मत जाणून घेण्याच्या दृष्टीने तसा प्रस्ताव लवकरच दिला जाऊ शकतो आणि सत्ता वाटपाच्या सूत्रावर चर्चाही होऊ शकते. उद्धव ठाकरे राजी नसतील, तर शिवसेनेचे काही आमदार फुटू शकतात. ५३ सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत पुन्हा जुळवून घेण्यासही भाजपचा विरोध नाही. नाराज अजित पवार हे आघाडीचा खेळ बिघडवू शकतात. दोन वर्षांपूर्वी त्यांना २२ आमदारांचा पाठिंबा होता. दुसरीकडे, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत कमालीचे अपयश पदरी पडल्याने विधानसभेत ४३ सदस्य असलेला काँग्रेस पक्ष आणखी खिळखिळा होण्याच्या मार्गावर आहे.