मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या नालेसफाईवर नाराजी व्यक्त करून मित्र पक्ष भाजपा अडचणीत आणण्याच्या तयारीत असल्याने शिवसेना वेळीच सावध झाली आहे़ त्यामुळे नालेसफाईबाबत असमाधान व्यक्त करीत शिवसेनेच्या शिलेदारांनी सावध भूमिका घेतली आहे़ पावसाळ्यात पाणी तुंबल्यास त्यासाठी पालिका प्रशासनाला जबाबदार ठरवत सेनेने आतापासूनच आपला बचाव सुरू केला आहे़गेल्याच आठवड्यात भाजपाने वांद्रे विधानसभा मतदारसंघातील नाल्यांची पाहणी केल्यानंतर सफाईच्या कामावर नाराजी व्यक्त केली होती़ स्वपक्षीय नगरसेवकांना नालेसफाईवर नजर ठेवण्याची ताकीदही भाजपा मुंबई अध्यक्ष अॅड़ आशिष शेलार यांनी दिली आहे़ त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही नाल्यात उतरले़ त्यामुळे पालिकेच्या आगामी निवडणुकीत नालेसफाईचा मुद्दा शेकणार हे ओळखून शिवसेनेनेही आता गळा काढण्यास सुरुवात केली आहे़ नालेसफाईचे काम ४० टक्के झाल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे़ मात्र जानेवारीमध्ये नालेसफाईची कामे सुरू होणे अपेक्षित असताना प्रत्यक्ष काम विलंबाने सुरू झाले. त्यामुळे काही ठिकाणी अद्यापही गाळ नाल्यात दिसून येत आहे़ मुंबईत पाणी तुंबल्यास त्यास पालिका प्रशासन जबाबदार असेल, असे मत सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी आज व्यक्त केले़ (प्रतिनिधी)>दक्षिण मुंबईला दिलासारेतीबंदर येथे ब्रिटानिया पम्पिंग स्टेशन १५ जूनपासून कार्यान्वित होणार आहे़ येथील एका पंपाद्वारे प्रति सेकंद ६ हजार लीटर पाण्याचा निचरा होणार आहे़ यापैकी एका पंपाची प्रायोगिक चाचणी आज करण्यात आली़ या पम्पिंग स्टेशनमुळे हिंदमाता, रे रोड रेल्वे स्टेशनजवळ, दिनशॉ पेटीट मार्ग, हिंदमाता, जीजीभॉय मार्ग, अभ्युदय नगर, सरदार हॉटेल, दत्ताराम लाड मार्ग, मडकेबुवा चौक, लालबाग, काळाचौकी, स्टार सिनेमा, भायखळा स्टेशन पूर्व, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मार्ग व आचार्य दोंदे मार्ग जंक्शन अशा १३ ठिकाणी यंदाच्या पावसाळ्यात दिलासा मिळणार आहे़
भाजपाच्या नाराजीने शिवसेनाही सावध
By admin | Published: May 17, 2016 3:23 AM