यदू जोशी -मुंबई: नारायण राणे आणि कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन मुंबई व कोकणावर भाजपने विशेष लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले असून, या ठिकाणी असलेल्या शिवसेनेच्या वर्चस्वाला शह देण्याची पुढील काळात रणनीती दिसते.
राणे यांची राजकीय कारकीर्द मुंबईत सुरू झाली आणि कोकणातील राजकारणावरही त्यांचा प्रभाव आहे. शिवसेनेचे कट्टर विरोधक अशी त्यांची प्रतिमा आहे. ठाकरे परिवार आणि शिवसेनेवर थेट हल्लाबोल करणारे नेते म्हणून ते ओळखले जातात. शिवसेनेचा विरोध असल्याने त्यांच्या भाजप प्रवेशात आणि नंतर त्यांना राज्यसभेची खासदारकी मिळण्यात विलंब झाला, असे म्हटले गेले होते. राणे यांच्या रूपाने प्रखर शिवसेना विरोधकास संधी दिल्याने यापुढील काळात दोन पक्षांमधील संबंध अधिक ताणले जातील, असे दिसते. हे दोन पक्ष पुन्हा एकदा जवळ येणार असल्याचे म्हटले जात होते; पण मंगळवारी संपलेले विधिमंडळ अधिवेशन आणि बुधवारी राणेंचा मंत्रिमंडळात झालेला समावेश पाहता दोन्ही पक्षांमधील कटुता वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाणे आणि परिसरातील महापालिकांच्या निवडणुका यावर्षी आणि पुढील वर्षीच्या सुरुवातीला होत आहेत. मुंबई, कोकणात राणे तर ठाणे, भिवंडी, पालघरच्या पट्ट्यात कपिल पाटील यांच्या प्रभावाचा वापर शिवसेनेचा वारू रोखण्यासाठी करवून घेण्याची भाजपची रणनीती दिसते. मुंबई व परिसरात मोठी संख्या असलेल्या आगरी समाजाच्या व्होटबँकेवर भाजपने लक्ष केंद्रित केलेले दिसते. प्रीतम मुंडे यांना मंत्री न करता डॉ. भागवत कराड यांच्या रूपाने वंजारी चेहरा दिला गेला; हा मुंडे परिवारासाठी धक्का मानला जातो.
प्रकाश जावडेकर आणि संजय धोत्रे यांना वगळले. हे दोघेही मूळ भाजपजन आहेत. धोत्रे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी समर्थक मानले जातात. नारायण राणे, कपिल पाटील व भारती पवार हे मूळ भाजपजन नाहीत. राणे यांचा प्रवास शिवसेना-काँग्रेस-भाजप असा राहिला, तर पाटील व पवार पूर्वी राष्ट्रवादीत होते. बाहेरून आलेल्यांना पक्षात संधी आजवर दिली गेली नव्हती. आता तो दरवाजा उघडलेला दिसतो. जावडेकर यांना वगळणे सर्वांत धक्कादायक ठरले. रावसाहेब दानवे यांनी स्वत:चे स्थान टिकवले. धोत्रे यांना वगळल्याने विदर्भाचा टक्का कमी झाला; पण महाराष्ट्राचा वाढला आधी महाराष्ट्राचे तीन कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री होते. आता तीन कॅबिनेट आणि पाच राज्यमंत्री असतील.
मंत्रिमंडळात नव्याने समाविष्ट झालेले चारही चेहरे बघता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची ठरली असे दिसते. स्वत: फडणवीस यांनी ते केंद्रात जाणार नाहीत, हे आधीच स्पष्ट केले होते. मंत्रिमंडळात महाराष्ट्राला प्रतिनिधित्व देण्यासंदर्भात ज्या निवडक नेत्यांशी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी चर्चा केली, त्यात फडणवीस प्रामुख्याने होते.
केंद्रीय मंत्री विभागनिहाय- पीयूष गोयल, नारायण राणे, रामदास आठवले,कपिल पाटील (मुंबई, कोकण) - ४- नितीन गडकरी (विदर्भ) - १- डॉ. भारती पवार (उत्तर महाराष्ट्र) - १- रावसाहेब दानवे, भागवत कराड (मराठवाडा) - २
- नारायण राणे (मराठा), कपिल पाटील (आगरी), डॉ. भारती पवार (आदिवासी) आणि डॉ. भागवत कराड (वंजारी) असे सामाजिक संतुलन साधण्यात आले.- प्रकाश जावडेकर यांना वगळल्याने पश्चिम महाराष्ट्राला मोदी मंत्रिमंडळात स्थान नाही. केंद्रीय मंत्रिमंडळात आधी महाराष्ट्राचे सहा मंत्री होते आता ही संख्या आठ झाली आहे.- डॉ. संजय धोत्रे यांना वगळल्याने विदर्भाचे प्रतिनिधित्व एकाने कमी झाले.- डॉ. भागवत कराड यांना संधी लाभल्याने आणि रावसाहेब दानवे आधीच राज्यमंत्री असल्याने मराठवाड्याचे दोघे केंद्रात मंत्री असतील.